...

पुण्यात काँग्रेसला मोठा झटका : युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांचा ही राजीनामा !

पुणे : महाराष्ट्रात काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर (Former MLA Ravindra Dhangekar) यांच्या शिवसेना प्रवेशानंतर, भोरचे माजी आमदार व काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे संग्राम थोपटे (Former MLA Sangram Thopte) हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. अश्यातच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसला नाराज नेतेमंडळींची मनधरणी करता येत नसल्याचे दिसून येत आहे. पक्षातील नेते मंडळींमध्ये समन्वय नसून अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्ते हताश असल्याची परिस्थिती काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. (Youth Congress General Secretary Rohan Suravase Patil resigned.)

 

 

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या राजीनामा पत्रात रोहन सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे की, “सरचिटणीस पदावर काम करत असताना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला प्रमाण मानून आजपर्यंत मी काम केले. कुठल्याही गटातटाच्या भानगडीत न पडता माझ्या खांद्यावर पक्षाची जी जबाबदारी आहे ती लक्षात ठेवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि पक्षाचे नाव चांगल्या पद्धतीने कायम अधोरेखित होईल अश्या आशयानेच मी आजवर काम करत आलोय. पक्षकार्यात मी नेहमीच सक्रियपणे काम केले आहे. जनप्रश्र्नांसाठी अनेक आंदोलने केली युवक काँग्रेसच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभागी राहिलो.
२०२१ सालच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सरचिटणीस पदावर निवडून आल्यानंतर संघटनेसाठी काम करत असताना या पदाला कायमच न्याय देण्याचे आणि पक्षाची गरिमा कायम राखण्यासाठी किंबहुना ती वृद्धिंगत करण्यासाठी मी सदैव कटिबध्द राहिलो आहे.
काँग्रेस हा एक विचार आहे. हा विचार आणि हा पक्ष आजही तळागाळातील आणि गावकुसातील सर्वसामान्यांपासून ते मध्यमवर्गीय ते श्रीमंत अश्या सर्व स्तरातील लोकांना आपलासा वाटतो. मात्र, पक्ष संघटनेतील अनेक बाबी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पटत नाहीत. सध्या पक्ष अडचणीच्या काळातून जातोय तरीही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतोय याचा विचार पक्षनेतृत्वाने करावा अशी माझी अपेक्षा आहे.”

Local ad 1