...

पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा का खंडित होतो ? जाणून घ्या..! (Why is the power supply interrupted at the beginning of monsoon?)

तापलेल्या उन्हाळ्यानंतर सर्वांना प्रतीक्षा असलेल्या पावसाला कमी अधिक प्रमाणात सुरवात झाली आहे. पावसाळ्यात विद्युत अपघाताचा धोका (Risk of electrical shock) अधिक असतो. त्यामुळे घरगुती व सार्वजनिक वीजयंत्रणेपासून (Domestic and public power systems) अधिक सावध राहणे आवश्यक आहे. तसेच महावितरणकडून येत्या २६ जून ते २ जुलै २०२३ पर्यंत राष्ट्रीय वीजसुरक्षा सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ होते त्यामागील कारणे काय याबाबत माहिती देणारा हा लेख. (Why is the power supply interrupted at the beginning of monsoon?)

 

खबरदारी हीच वीज सुरक्षा ! (Caution is electricity safety!)

पाणी हे विजेचे वाहक असल्याने विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व महावितरणच्या कार्यालयाशी (Maharashtra State Electricity Distribution Co) तात्काळ संपर्क साधावा. विद्युत उपकरणे, स्वीचबोर्ड असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस किंवा विद्युत उपकरणांना हात लावू नये. ओलसर हातांनी विजेची उपकरणे हाताळू नयेत. ही उपकरणे खिडकी तसेच बाल्कनी पासून दूर ठेवावीत. जेणेकरुन त्यात पावसाचे पाणी जाणार नाही. विद्युत उपकरणे ओलसर झाले असल्यास ते त्वरित बंद करून प्लग सह बाजूला करावे. तसेच पावसाळ्यात कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये तसेच ही तार विजेच्या खांबाला किंवा इतर वीज यंत्रणेला बांधू नये.

 

मेन स्विच मध्ये फ्यूज वायरच असावी

घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये (main switch box) व किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. ही फ्यूज तार वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार फ्यूजसाठी वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.

 

 

विद्युत सुरक्षेसाठी उपाययोजनाही महत्वाच्या ! (Measures for electrical safety are also important)

वीजमीटरपासून घरामध्ये केलेल्या जुनाट वायरिंगची स्थिती योग्य असल्याची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी. वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. सर्व विद्युत उपकरणांचे अर्थींग योग्य असल्याची खबरदारी घ्यावी. वीजसंच मांडणीमध्ये विजेचा धोका टाळण्यासाठी योग्य ‘अर्थिंग’ हा पाया आहे. तसेच मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज इत्यादी उपकरणांसाठी थ्रीपिन सॉकेट चाच वापर करावा. कारण थ्री पिन सॉकेट मध्ये अर्थिंग ची व्यवस्था असते.

 

ओल आलेल्या भिंतीला, लोखंडी पत्र्याला, फ्रीज, टिव्ही, संगणक (Fridge, TV, Computer) किंवा पाण्याचे नळ, कुलर आदींना हात लावल्यावर झिणझिण्या येत असतील वायरिंगची तात्काळ तपासणी करावी. कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नये. ओलसर लोखंडी पाईप, कृषिपंपाची पेटी, पाण्याच्या मोटार पंपांला स्पर्श करण्यापूर्वी पायात कोरडी रबरी किंवा प्लास्टिक चप्पल वापरावी. जुनाट व खराब झालेली वायरिंग तत्काळ बदलून घ्यावी. आकाशातील विजेचा कडकडाट होत असेल तर विद्युत उपकरणे बंद करून ते स्वीच बोर्डच्या प्लगपासून बाजूला करावी. वीज पडल्यास त्या भागातील विद्युत प्रवाहाचा दाब वाढून विद्युत उपकरणांचे नुकसान होऊ शकते.

 

सर्कीट ब्रेकर, एक सुरक्षा कवच!- घर, दुकान, सोसायट्या व इतर वास्तुमधील अंतर्गत वायरिंग, विविध उपकरणे किंवा लोखंडी साहित्यामधील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून विद्युत अपघात होतात. यासाठी प्रामुख्याने वायरिंगमधील करंट लिकेज तसेच योग्य क्षमतेचे सर्कीट ब्रेकर किंवा अर्थिंग नसणे कारणीभूत असल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून घर किंवा इतर वास्तुंमध्ये सर्कीट ब्रेकर (‘ELCB’, ‘RCCB’, ‘MCB’) लावल्यास विद्युत अपघात टाळता येतात.

 

घरगुती किंवा इतर आस्थापनांमधील अंतर्गत वीजयंत्रणेत बिघाड झाल्यास आणि वीजपुरवठा खंडित न होता सुरु राहिल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते. वीजपुरवठा तात्काळ खंडित होणे आवश्यक आहे. त्यामुळे घर, सोसायटी किंवा इतर वास्तुंमध्ये सर्कीट ब्रेकर जसे की अर्थ लिकेज सर्कीट ब्रेकर (इएलसीबी), रेसीड्यूअल करंट सर्कीट ब्रेकर (आरसीसीबी) मिनिएच्यूअर सर्कीट ब्रेकर (एमसीबी’) लावणे अत्यावश्यक आहे. अंतर्गत वायरिंग किंवा उपकरणामधील दोषामुळे सर्किट ब्रेकर म्हणजे विद्युत अपघात टाळणारे प्राथमिक व महत्वाचे सुरक्षा कवच आहे. विविध उपकरणांचा क्षमतेपेक्षा अधिक वीज वापर, इलेक्ट्रीक सर्कीटमध्ये दोष निर्माण होऊन करंट लिकेज होणे, शॉर्टसर्किट होणे, व्होल्टेज वाढणे, अर्थ फॉल्ट होणे आदी प्रकारांपासून होणारे विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्कीट ब्रेकरकडून वीजप्रवाह खंडित केला जातो. सर्कीट ब्रेकर सुरक्षा कवच असल्याने ते प्राधान्याने घर, कार्यालय आदी ठिकाणी लावून घेणे गरजेचे आहे.

सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावध राहा (Beware of public power lines)

अतिवृष्टीमुळे, वादळाने तुटलेल्या किंवा झुकलेल्या वीजतारा, खांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नये. सावध राहावे. वीजप्रवाह सुरु असण्याची शक्यता असल्याने विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. तसेच तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांना किंवा इतर सार्वजनिक ठिकाणच्या वीजयंत्रणेला हात लावण्याचा किंवा तुटलेल्या तारा हटविण्याचा प्रयत्न करू नये.

 

विद्युत सुरक्षेसाठी काय करू नये !

विद्युत खांबांनाव तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. कपडे वाळविण्यासाठी लोखंडी तारांचा वापर टाळावा. अनावधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर अपघात होऊ शकतो. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून सुरक्षित अंतरावर असावेत. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा घरातील कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विशेषतः लोखंडी पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. तसेच वायरची जोडणी करावीच लागली तर त्यावर इन्सुलेशन टेप लावावी.

 

 

पावसाळ्याच्या सुरवातीला वीजपुरवठा का खंडित होतो ? (Why is the power supply interrupted at the beginning of monsoon?)

वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनीमातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हात चिनीमातीचे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो.

 

भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही. परंतु, पावसाला सुरवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व वाहिनीत बिघाड होतो. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधला जातो. दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जाईंट करणे आदी कामे करावी लागतात. वीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारणे म्हणजे वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो.

 

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील जागेत घरातील सुका व खाद्यपदार्थांचा ओला कचरा टाकण्यात येतो. खाद्यपदार्थामुळे मांजर, उंदीर, घुस, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात आणि वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. प्राण्याचा नाहक जीव जाण्याचेही प्रकार घडले आहेत.

 

अभियंते व जनमित्रांची कसोटी

पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खर्‍या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्‍यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणाऱ्या महावितरणच्या अभियंता व जनमित्रांसाठी पावसाळा अतिशय आव्हानात्मक असतो.

 

तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध (Toll free number available 24 hours for complaints)

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. वीजसेवेविषयक सर्व प्रकारची तक्रार दाखल करता येते. सोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती देण्याची सोय देखील उपलब्ध आहे.

– निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे

 

Local ad 1