फॉर्म नंबर 17 म्हणजे काय ? कशासाठी भरला जातो फॉर्म नंबर 17…

अर्ज करण्यास 20 डिसेंबर 2023 पर्यंत अंतिम मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी (Secondary School Certificate Class 10) व उच्च माध्यमिक (Higher Secondary) व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरुन खाजगी विद्यार्थी म्हणून परीक्षेस बसण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (What is Form No. 17? What is this application for?)

 

 

फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने अतिविलंब शुल्काने करण्यास बुधवार 20 डिसेंबर 2023 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी अर्ज स्विकारण्याची मुदत 7 नोव्हेंबर पर्यंत निश्चित करण्यात आली होती. जे विद्यार्थी दिलेल्या या मुदतीत नावनोंदणी करु शकले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने अतिविलंब शुल्काने सादर करावयाची सुविधा राज्य शिक्षण मंडळाकडून उपलब्ध करुन दिली आहे.

 

 

अतिविलंब शुल्कासह अंतिम मुदतवाढ कालावधी पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे. अतिविलंब शुल्क इयत्ता दहावी व बारावी साठी प्रती विद्यार्थी प्रती दिन 20 रुपये स्विकारुन नावनोंदणी अर्ज सोमवार 11 डिसेंबर 2023 ते बुधवार 20 डिसेंबर 2023 या कालावधीत भरावयाचा आहे.

 

 

खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ते इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संकेतस्थळ इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in , इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in हे आहे.

 

 

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/ मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.

 

 

संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावीत. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे नावनोदणी अर्जावर नमूद केलेल्या मध्यामिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहे.

किती आहे शुल्क…

खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क + 100 रुपये प्रक्रिया शुल्क + विलंब शुल्क / अतिविलंब शुल्क. तर इयत्ता बारावीसाठी 600 रुपये नोंदणी शुल्क + 100 रुपये प्रक्रिया शुल्क + विलंब शुल्क / अतिविलंब शुल्क राहिल.

 

 

 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी विद्यार्थ्यांची पूर्वीची शाळा किंवा पत्त्यानुसार सर्वात जवळची माध्यमिक शाळेची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या माध्यमिक शाळेने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन करावयाचे आहे. याबाबत सर्व माध्यमिक शाळांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे. या वर्षापासून संपर्क केंद्र पद्धत बंद करण्यात आली असल्याने मान्यताप्राप्त सर्व शाळांमधून खाजगी विद्यार्थी अर्ज स्विकारणे अनिवार्य आहे. याची सर्व मान्यताप्राप्त शाळांनी नोंद घ्यावी व उचित कार्यवाही करावी.

 

 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता व त्यांने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील विद्यार्थ्यांची शाळा/कनिष्ठ महाविद्यालय किंवा पत्त्यानुसार सर्वात जवळच्या शाळेची/कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा द्यायच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.

 

 

इयत्ता दहावी व बारावी फेब्रुवारी-मार्च 2024 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने जसे डेबिट कार्ड, क्रिडिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंगद्वारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वत:कडे ठेवून त्याच्या दोन छायाप्रती माध्यमिक शाळेस / कनिष्ठ महाविद्यालयास देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची ( उदा. माध्यम, शाखा, माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

 

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा.

 

 

विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. खाजगी विद्यार्थी अतिविलंब शुल्काने नाव नोंदणी करण्याकरीता अंतिम मुदत बुधवार 20 डिसेंबर 2023 असणार आहे. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही यांवी सर्व संबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे प्र. सचिव माणिक बांगर (State Board Q. Secretary Manik Bangar) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

Local ad 1