लग्नाचे व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांकडे द्यावे लागणार

पुणे: कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन कठोर निर्णय घेत आहे. लग्नसमारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पोलिसांची पूर्वपरवानी घ्यावी लागणार असतानाच लग्नसमारंभ झाल्यानंतर पाच दिवसांत व्हिडिओ चित्रीकरणाची सीडी पोलिस ठाण्यात जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

ग्रामीण भागामध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे कोरोचा प्रादुर्भाव रोखणे आणि आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करून मृत्यू टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन काही निर्णय घेत आहे. काही ठिकाणी लग्नसमारंभामुळे कोरोनाचा प्रसार झाल्याचे स्पष्ट झाले. लग्न, साखरपुडा आदी कार्यक्रमांना मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहात असून नागरिक कोरोनाविषयक सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र, आता राज्य शासनाच्या सूचना व नियमांचे पालन करणार असल्याचे हमीपत्र मंगलकार्यालय मालकांना द्यावे लागणार आहे.

खासगी समारंभ-कार्यक्रमांत कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम व अटी पाळल्या जातात की नाही, हे तपासण्यासाठी भरारी पथके नेमण्यात येणार आहेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. लग्नसमारंभासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असून, सर्व उपस्थितांना मास्कचा वापर बंधनकारक आहे.

प्रवेशद्वाराजवळ उपस्थितांचे नाव, मोबाइल क्रमांक व स्वाक्षरी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऑक्सिमीटर, इन्फ्रा थर्मामीटरचा वापर करून येणार्या प्रत्येकाची तपासणी करावी लागणार असून, सभागृह वारंवार निर्जंतुकीकरण करण्याचे आदेशही दिले आहेत.

Local ad 1