रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी निघालेले अधिक्षक अभियंता केवळ अर्ध्या तासात यवतमाळ येथून थेट सोलापुरात पोहोचले !

 

पुणे.  राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोळ झाल्याचे अनेकवेळा मॅटच्या निर्णयाने उघड झाले आहे. परिणामी सरकारला तोंडघशी पडावं लागलं आहे. तरीही सर मधील मंत्री आणि अधिकारी धडा घेत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आल आहे. झालं असं की, सोलापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांची बदली झाली. त्यांच्या जागी यवतमाळ येथील अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे यांची नियुक्ती केली गेली. यवतमाळ ते सोलापूर हे अंतर सुमारे ५०० कि.मी. आहे. मात्र, धोत्रे अवघ्या ३० मिनिटांत सोलापूरमध्ये हजर झाल्याचा ‘चमत्कार’ घडला, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. 

 

 

दरम्यान, हे प्रकरण ‘मॅट’कडे गेले आहे. ‘३० मिनिटांत सोलापुरात कसे पोहोचलात?’ अशी विचारणा ‘मॅट’ने राज्य सरकार आणि धोत्रे यांना केली आहे. त्यावेळी दोघांच्या वकील उत्तर देता आल नाही. (The Superintending Engineer reached Solapur directly from Yavatmal in just half an hour)

 

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील या बदलीमुळे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणापुढे (मॅट) बदली प्रक्रियेचे वाभाडे तर निघालेच, परंतु यवतमाळवरून पदभार सोडून ३० मिनिटांमध्ये सोलापूरमध्ये कसे पोहोचलात? अशी विचारणा मॅटने राज्य सरकार आणि धोत्रे यांना केली आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना सरकारच्या नाकीनऊ आले असून, तूर्त तरी ‘मॅट’ने ‘जैसे थे’चे आदेश दिल्याने अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे मध्येच लटकले अहेत.

 

मुख्य अभियंता यांना आली शंका आणि बिंग फुटले 

सोलापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या संकेतस्थळावर १४ ऑगस्ट रोजी दोन वाजून ५७ मिनिटांनी बदली आदेश जारी करण्यात आला. यवतमाळ येथे कार्यरत असलेले संभाजी धोत्रे यांना अमरावती मुख्य अभियंता यांच्याकडून आदेश प्राप्त करून घेऊन कार्यभार सोडण्यास सांगितले होते. मात्र, ते प्रत्यक्षात १४ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून २९ मिनिटांनी विशिष्ट फॉर्म भरून सोलापूर अधीक्षक अभियंता कार्यालयात हजर झाले. त्यांनी पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांना दूरध्वनी करून रुजू होण्यासाठी परवानगी मागितली. मात्र, चव्हाण यांना शंका आल्याने त्यांनी अमरावतीमध्ये विचारणा केली. विशेष म्हणजे धोत्रे हे १४ ऑगस्ट रोजी क्षेत्रीय स्तरावरील रस्त्यांच्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी गेले होते, असे असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात यवतमाळचा कार्यभार न सोडता अवघ्या ३० मिनिटांमध्ये ते सोलापूरला कसे आले हा प्रश्न निर्माण झाला. विशेष म्हणजे या बदलीचे आदेश पुण्यातील मुख्य अभियंता कार्यालयाला मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी देखील एकतर्फी रुजू करून घेण्यास नकार दिला.

 

दरम्यान या बदलीला मॅटमध्ये आव्हान देण्यात आले तेव्हा न्यायालयाने देखील अधीक्षक अभियंता धोत्रे हे ३० मिनिटांमध्ये यवतमाळ वरून सोलापूरमध्ये कसे पोहोचले याबद्दल खुलासा मागितला तो त्यांना देता आला नाही.

 

बदली आदेशापूर्विच अधिकारी पदभार घेण्यासाठी सोलापूरात 

मनमानी पद्धतीने अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. बदली होणाऱ्या अधिकाऱ्याला बदली होणार, याची किंचितदेखील कल्पना नसते; परंतु अचानकपणे मंत्रालयातून बदली आदेश येतो आणि दारात उभे असलेले नवे अधिकारी बदलीच्या ठिकाणी कार्यालयात येऊन एकतर्फी पदभार घेतात. पुणे जिल्ह्यात अशा पद्धतीने आठ ते दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

 

 

Local ad 1