पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील पोर्शे कार चालक अल्पवयीन मुलाच्या आईला शनिवारी (दि.1) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. सकाळी साडेसात वाजता वडगावशेरी येथील राहत्या तिला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते. वैद्यकीय चाचणीच्या दरम्यान ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. बदलण्यात आलेले रक्तनमुने मुलाच्या आईचे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तशी कबुली मुलाच्या आईने पोलिसांसमोर दिली आहे. तर मुलाच्या बिल्डर वडीलांना देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. (The police arrested the mother of the minor son of the Porsche car driver)
अपघातप्रकरणी,अकीब मुल्ला याने दिलेल्या फिर्यादीनुसार, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढे त्या गुन्ह्यातील कलम वाढ करून ससून रुग्णालयातील न्याय वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, प्रथमोपचार विभाग प्रमुख डॉ.श्रीहरी हाळनोर, शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली. या तिघांनी मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याचे काम केले. अल्पवयीन मुलाची आई आणि त्याचे बिल्डर वडील या दोघांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने त्यांना देखील याच गुन्ह्यात आता पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले.
कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. त्यावेळी ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलासह चौघेजण उपस्थित होते. याप्रकरणी ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली. तपासात मिळालेली माहिती, तसेच रक्तनमुने बदलणे प्रकरणात अल्पवयीन मुलाची आईला शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. रेंजहिल्स् येथील गुन्हे शाखा युनिट चारच्या कार्यालयात तिची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने मुलाचे बदलण्यात आलेले रक्त आपलेच असल्याची कबुली दिली. रुग्णालयातील ताब्यात घेण्यात आलेले चित्रीकरण तसेच तांत्रिकविश्लेषनामध्ये मुलाची आई तेथे उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
ससूनमधील मुख्य वैद्यकीय अधिकार्यांच्या कक्षात रक्तनमुने घेण्यात आले होते. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणात मुलाला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांनी रक्तनमुने घेताना विशेष खबरदारी घेतली होती. त्यावेळी ससूनमध्ये एका महिलेला बोलाविण्यात आले होते. महिलेचे रक्तनमुने न्यायवैद्यक शास्त्र विभागात (फॉरेन्सिक डिपार्टमेंट) घेण्यात आले नव्हते. मुख्य वैद्यकीय अधिकार्यांच्या कक्षात रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने कोणताही पुरावा राहणार नाही, याची काळजी डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांनी घेतली होती.