पुणे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (Maharashtra State Road Development Corporation) पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे वर्तुळाकार रस्ता (रिंगरोड) प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम १२ टप्प्यांत होणार असून, यापूर्वी नऊ टप्प्यांतील कामासाठी निविदा अंतिम करून कंत्राट देण्यात आली आहेत. तर आता उर्वरित तीन टप्प्यांतील कामासाठीच्या आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार दोन टप्प्यासाठी अफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरकडून (Afcons Infrastructure) तर एका टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्टकडून (GR INFRAPROJECT) सर्वात कमी बोली लावण्यात आली. त्यामुळे या दोन कंपन्यांना कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रिंगरोडच्या १२ ही टप्प्यांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे आता भूमिपुजन लवकरच होण्याची शक्यता आहे. (Tender process for Pune Ring Road completed)
एमएसआरडीसी 168 किमी लांबीच्या पुणे रिंगरोडचा प्रस्ताव आहे. येत्या काही दिवसातच या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे. या प्रकल्पातील नऊ टप्प्यांतील कामाचे कंत्राट बहाल करून पात्र कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. भूसंपादन ही अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाला आणखी वेग देण्यासाठी उर्वरित तीन टप्प्यांतील निविदा प्रक्रिया अंतिम करण्याच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. १२ पैकी तीन टप्प्यांची निविदा प्रक्रिया काही कारणाने उशीराने सुरू झाली असून सोमवारी तीन टप्प्यांसाठीच्या आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत.
वलाटी, हवेली ते सोनेरी, पुरंदर या E५ टप्प्यासाठी अफकॉन आणि नवयुगा इंजिनीअरिंग कंपनीकडून आर्थिक निविदा सादर करण्यात आल्या होत्या. तर सोनोरी ते गराडे, पुरंदर या E६ टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्ट, पटेल इन्फ्रास्ट्रक्चर, पीएनसी इन्फ्राटेकसह अन्य एका कंपनीने निविदा सादर केली आहे. त्याच वेळी गराडे, पुरंदर ते शिवरे, भोर या E ७ टप्प्यासाठी नवयुगा अफकॉनने निविदा सादर केल्या आहेत. त्यानुसार E५ आणि E७ टप्प्यासाठी सर्वात कमी बोली अफकॉनकडून तर E६ टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्टकडून लावण्यात आली आहे. त्यामुळे अफकॉनला दोन टप्प्याचे तर जीआर इन्फ्राप्रोजेक्टला एका टप्प्याचे काम मिळण्याची शक्यता आहे.
पुणे रिंगरोड हा एमएसआरडीसीद्वारे ४ ते ६ लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग म्हणून विकसित केला जाईल. त्याचे बांधकाम खेड, हवेली, पुरंदर, भोर, मुळशी आणि मावळ या तालुक्यांमधून प्रस्तावित आहे. एमएसआरडीसीने जानेवारी २०२४ मध्ये १८ कंपन्यांकडून ९०० दिवसांच्या बांधकाम मुदतीसह कमर्शियल टेंडर आमंत्रित केले होते. एप्रिल २०२४ मध्ये या १२ कंपन्यांकडून २६ टेंडर प्राप्त झाली होती. पुणे रिंग रोडच्या पूर्व भागात ऊर्से ते सोलू ते सोरतापवाडी (पुणे-सोलापूर रस्ता) या रस्त्याच्या १९,९३२ कोटी ९८ लाख रुपये इतक्या किंमतीच्या कामांना, तसेच पुणे रिंग रोड पश्चिम भागात ऊर्से ते वरवे (बु.) सातारा रोडसाठी २२,७७८ कोटी ५ लाख इतक्या किंमतीच्या कामांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. दोन टप्प्यात रिंगरोडचे काम करण्यात येणार आहे.
या कंपन्यांची सर्वात कमी बोली
रिंग रोडच्या दोन टप्प्यासाठी अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चरकडून तर एका टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्टकडून सर्वात कमी बोली लावण्यात आली आहे. त्यामुळे या दोन कंपन्यांना कंत्राट मिळण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक समस्या सुटणार
पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करणारा रिंग रोड प्रकल्प खेड, मुळशी, मावळ आणि हवेली या चार तालुक्यातून जात आहे. या चार तालुक्यातील ४४ गावांमधून त्यासाठी जमीन संपादीत केली जात आहे. १५ ते २० किलोमीटरवर हे रिंगरोड असणार आहे. यामुळे बाहेर गावातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना पुणे शहरात येण्याची गरज पडणार नाही. त्यांना रिंगरोडने परस्पर पुणे शहराबाहेरून पुढील प्रवासासाठी जाता येणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक समस्या सुटणार आहे.