(soybean seeds) सोयाबीन बियाणे घरच्या घरी कसे तयार करता येईल, हे जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा…

गेल्या दोन दशकात महाराष्ट्रात सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात  पेरणी होते आहे. पावसावर अवलंबून असलेल्या खरीप शेतीसाठी शेतकऱ्यांना इतर पिकापेक्षा थोडं किफायती आणि हातात पैसे देणारं पीक म्हणून सोयाबीन पेरा वाढला… खत आणि बियाणे यांचे वाढते भाव.. हे एवढे प्रचंड महागडे बियाणे घेऊन त्याची उगवणचं झाली नाही तर होणारा तोटा हा मुक्कामार लागलेल्या जागे सारखा असतो… त्याच्या वेदना बघणाऱ्याला जाणवत नाहीत..  पण भोगणाऱ्याला कळतं… ती जाणीव ठेवून शास्त्र शुद्ध बियाणे घरच्या घरीच करण्यासाठी कृषी विभागाने प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली… मृग नक्षत्र काही दिवसावर येऊन ठेपलं आहे… त्यासाठी आम्ही सोयाबीन बियाणे घरच्या घरी कसे तयार करता येईल यावर प्रकाश टाकणारा लेख देत आहोत… तुम्हाला नक्की उपयोगाला पडेल….!! (soybean seeds)

मागील दोन-तीन वर्षात खरीप हंगामामध्ये उशीरा व अवेळी पाऊस, पावसातील खंड, पीक काढणीच्या अवस्थेत पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीमुळे सार्वजनिक संस्थामार्फत उत्पादित होणारे प्रमाणित बियाणे व खाजगी संस्थांमार्फत उत्पादित होणारे सत्यप्रत बियाणे उत्पादनाची साखळी विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे प्रमाणित/सत्यप्रत बियाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे.स्थानिक पातळीवर सोयाबीनचे ग्रामबीजोत्पादन तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे. (soybean seeds)


           शासनाच्यावतीने खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घरच्या घरी तयार केलेले सोयाबीनचे बियाणे वापरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी घरच्या घरी गुणवत्तापूर्ण सोयाबीनचे बियाणे कसे तयार करावे, कोणती काळजी घ्यावी, कोणकोणती औषधी वापरावी, घरी बियाणे साठवणूक करतांना कोणती काळजी घ्यावीयाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्याच्यादृष्टीकोनातून या लेखाच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी स्थानिक पातळीवर सोयाबीन ग्रामबीजोत्पादन तंत्रज्ञानाविषयी ठळक मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत.

शेतकऱ्यांनी स्वतःकडील राखून ठेवलेल्या सोयाबीन बियाण्याचा पेरणीसाठी वापर करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी: रायझोबियम व पीएसबी या जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपुर्वी ३ तास अगोदर बीज प्रक्रिया करुन असे बियाणे सावलीत वाळवावे. पेरणीपुर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.बियाण्याची पेरणी पुरेशा ओलीवर आणि३ ते ४ से.मी. खोलीपर्यंत करावी. प्रति हेक्टरी दर ७० किलो वरून ५० ते ५५ किलो आणण्यासाठी सोयाबीन बियाणे टोकण पद्धतीने किंवा प्लांटरच्या सहाय्याने रुंद वरंबा सरी पद्धत (बीबीएफ) यंत्राने पेरणी करावी.

सोयाबीन बियाणे साठवणूकी संदर्भात घ्यावयाची काळजी: बियाणे घरी साठवणूक करतेवेळी सोयाबीन बियाण्याची थप्पी ७ पोत्यांपेक्षा उंच जाणार नाही याची दक्षता घ्यावी. बियाणे साठवणूकही दमट व ओलसर जागेच्या ठिकाणी करू नये. बियाणे साठवणूक करण्यापूर्वी जमिनीवर तट्टे किंवा लाकडी फळ्या किंवा जुने पोते इत्यादी अंथरून त्यावर बियाण्याची साठवण करावी. (soybean seeds)

बियाण्याचे पोते सिलिंग करण्यापूर्वी बियाण्याची प्रत चांगली असल्याची खात्री करून घ्यावी. प्रत्येक पोते तपासणी करून ज्या पोत्यामध्ये काडीकचरा, दगडमाती, काळपट व ओलसर बियाणे आढळून आल्यास त्या पोत्याचे सिलिंग करू नये. शेतक-यांनी स्वत:कडील पेरणी योग्य सोयाबीनची ३ वेळा उगवणक्षमता चाचणी करूनच पेरणी करावी. (डिसेंबर व जानेवारीमध्ये साठवणूकी दरम्यान व बीजप्रक्रीया दरम्यान, मार्च महिण्यात विक्री दरम्यान, मे व जूनमध्ये प्रत्यक्ष पेरणीपूर्वी ) बियाणे साठवणूक करण्यात येत असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी गळणार नाही याची खात्री करूनच बियाण्याची साठवण करावी. तसेच अवकाळी येणाऱ्या वादळी पावसापासून बियाणे खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी.बियाणे व खते यांची एकाच ठिकाणी साठवणूक करू नये. प्रत्येक बियाणे उत्पादक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी उगवणक्षमता चाचणी करावी. सोयाबीन बियाण्याचे कवच नाजूक असल्यामुळे त्याची कमीत कमी हाताळणी करण्यात यावी.

सोयाबीनची उगवणक्षमता घरच्या घरी कशी तपासावी याबाबतची माहिती: राखीव सोयाबीन साठ्यामधील सोयाबीन बियाण्याची शेतकरी स्तरावर उगवणक्षमता चाचणी खालीलप्रमाणे घेण्यात यावी. राखीव साठ्यामधील बियाण्याची किमान तीन वेळा घरगुती पद्धतीने स्थानिक पातळीवर उगवण क्षमता चाचणी घेणे आवश्यक आहे. (बियाणे साठवणूक करतेवेळी, मार्च अखेर व पेरणीपूर्व) त्यामुळे मार्चमध्ये राखीव साठ्याची घरगुती पद्धतीने बियाण्याची उगवण चाचणी घेण्यासाठी शेतक-यांमध्ये जागृती निर्माण करणे व आपल्या अधिनस्त यंत्रणेला गावनिहाय व शेतकरीनिहाय याचे सनियंत्रण करण्याबाबत सूचित करावे.

शेतक-यांनी स्वत:कडे असलेले बियाणेची चाळणी करुन त्यामधील काडीकचरा, खडे, लहान/फ़ुटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणीनंतर स्वच्छ झालेले एका आकाराचे बियाणे चाचणीसाठी निवडावे. वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याला चार घड्या पाडाव्यात. यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी १० बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशारितीने १०० बियांच्या १० गुंडाळ्या तयार कराव्यात. नंतर या गुंडाळ्या पॉलिथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळुहळु उघडून पाहुन त्यामध्ये बीजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात.

             जर ती संख्या ५० असेल तर उगवणक्षमता ५०% आहे असे समजले जाते. जर ती संख्या ८० असेल तर उगवणक्षमता ८०% आहे असे समजावे. अशा पध्दतीने उगवणक्षमतेचा अंदाज घेता येतो. सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चांगली म्हणजेच ७० ते ७५% असेल तर शिफ़ारस केलेल्या मात्रेनुसार प्रति हेक्टर ७५ किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. शेतक-यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यापुर्वी त्याची उगवणक्षमता उपरोक्त पध्दतीने तपासून नंतरच अशा बियाण्याची पेरणी करावी. उगवणक्षमता७० टक्केपेक्षा कमी असल्यास त्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी  वापरावे.

खरीप हंगाम २०२१ सोयाबीन बियाणे वापराबाबत शेतक-यांना आवाहन
१) सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षापर्यंत वापरात येते.
२) शेतक-यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल.
३) मागील दोन वर्षात शेतक-यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासुन उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालु वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरु शकतात. तसेच ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्याक्षिके योजनांतर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते.
४) प्रमाणित बियाण्यांपासून वरीलप्रमाणे आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी.
५) सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी.
६) बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्कयांपेक्षा जास्त नसावे.
७) साठवणूकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवतांना त्याची थप्पी ७ फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्याोवी.
८) बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी.  
९) प्रति हेक्टरी बियाणे दर ७५ कलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी.
१०) सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणेपेरणीसाठी वापरण्यात यावे.
११) ७५ ते १०० मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.
१२) बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे .
१३) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.
१४) रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी.

     संदीप राठोड,          
माहिती सहायक,  
 विभागीय माहिती कार्यालय, पुणे

Local ad 1