शरद पवारांकडे इच्छुकांची रांग ; उमेदवारी कोणाला देणार शरद पवारांनी केले स्पष्ट !

पुणे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे कोणत्याही क्षणी बिगुल वाजणार असून, सर्वच पक्षांनी आपण किती जागा लढवायच्या याची चाचपणी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत खलबते सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादीत फुटीनंतर शरद पवार यांना सोडून गेलेले आमदार पुन्हा परत येणार असल्याची चर्चा सुरू असून, आता याबाबत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार म्हणाले, “तसे काही नसून मतदान करणाऱ्या मतदारांकडून आम्हाला पत्रे येत असतात. लोकसभेत त्या आमदारांच्या विरोधात आम्ही तुम्हाला मतदान केल्याचे मतदार या पत्रांद्वारे सांगतात. त्यामुळं आता त्या आमदारांचा पक्षात पुन्हा समावेश झाल्यास विधानसभा निवडणुकीत मतदान करताना विचार करावा लागेल, असे मतदार आम्हाला सांगतात. (Sharad Pawar made it clear who will be his candidate in the assembly elections)

यावेळी शरद पवार यांना महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत विचारले असता ते म्हणाले, “आम्ही सध्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार सर्वेक्षण करत असून, विजयी होण्याच्या क्षमतेवर जो उमेदवार विजयी होईल, त्यालाच उमेदवारी देणार आहोत. आमचे एकच लक्ष्य आहे ते म्हणजे राज्यात आम्हाला सत्ताबदल करून आमचे सरकार आणायचे आहे.”

 

मुख्यमंत्रिपदाबाबत पवार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल. निवडून येण्याची क्षमता असलेल्या जागांचीही अदलाबदल केली जाईल. ज्या पक्षाचे उमेदवार जास्त निवडून येतील त्याच पक्षाला मुख्यमंत्रिपद देण्यात येईल.” विधानसभेला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे आमचे चिन्ह असणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.

Local ad 1