माझ्या मुंबईतील नरिमन पॉईंटच्या कार्यालयामधून मी बाहेर पडलो. स्टेट्स हॉटेलमध्ये बारामतीचे शिक्षक लक्ष्मण जगताप मला भेटण्यासाठी माझी वाट पाहत होते. मी खुर्चीत बसताच जगताप सर माझा हात हातामध्ये घेऊन म्हणाले, ‘भाई, रविवारचा लेख पुन्हा सुरू करा. लेख बंद झाल्यापासून आयुष्यात काहीतरी चुकल्यासारखे वाटते’. मी एका क्षणाचाही विलंब न लावता म्हणालो, ५ जानेवारीपासून मी पुन्हा ‘भ्रमंती’ १५० वर्तमानपत्रांत लिहितोय. तेही मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, गुजराथी (Marathi, Hindi, English, Urdu, Gujarati) भाषिक पेपरमध्ये येणार आहे. (Sandeep Kale Bhramanti Live Story)
RTE admission process । आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार ?
विजयचे मारेकरी कोण ?
मला पुण्यावरून राधिका वहिनीचा फोन आला. वहिनी फोनवर जोरजोराने रडत होत्या. भावजी विजय आम्हाला सोडून गेला, असे म्हणत त्यांनी फोन ठेवला. काय करावे काही सुचेना. समोर असलेला पाण्याचा ग्लास मी तोंडाला लावला. पाणी पिऊन झाल्यावर मला अश्रू अनावर झाले. क्षणाचाही विलंब न करता मी पुण्याच्या दिशेने निघालो. (Who is Vijay’s killer?)
मी आता सांगतोय हा प्रसंग आहे चार वर्षांपूर्वीचा. विजय नागपूरच्या एका चांगल्या महाविद्यालयामध्ये नोकरीसाठी होता. विजयच्या आईला कॅन्सर झाला होता. आईला पुण्यात सतत दवाखान्यात न्यावे लागायचे. आई-वडिलांची होत असलेली फरपट विजयला पाहावत नसे. त्यांनी मला सल्ल्यासाठी फोन केला आणि विचारलं, ‘मी नागपूरचे महाविद्यालय सोडून पुण्याला येणार आहे. मला पुण्यामध्ये एखाद्या इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये नोकरी पाहा’. आमच्या दोघांच्याही प्रयत्नाने एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून विजयचे काम झाले. आईची सेवा करत,पुण्यासारख्या शहरात एका नावाजलेल्या महाविद्यालयामध्ये सेवेची संधी मिळाली. हे दोन्ही विषय घेऊन विजय आनंदी होता. पण तो काम करत असलेल्या महाविद्यालयात तो जसे जसे दिवस घालवत होता, तसे तसे त्या कॉलेजमध्ये नाव मोठे आणि लक्षण खोटे अशीच परिस्थिती आहे, हे विजयच्या लक्षात येऊ लागले. त्या महाविद्यालयात चार-पाच महिन्यांनंतर पगार व्हायचा. तोही एखाद्या महिन्याचा. विजयकडे कुठून पैशाची आवक नव्हती. महाविद्यालयामध्ये असणारं काम इतकं मोठ्या स्वरूपात होतं की, महाविद्यालयायाच्या कामाशिवाय इतर ठिकाणी चार पैसे मिळतील यासाठी हात पाय हलवायची संधीच नव्हती. दुसरीकडे काम मिळण्याची संधी येत होती, पण या महाविद्यालयामध्ये दोन-चार महिने थकलेला पगार दुसरीकडे गेल्यावर मिळत नाही. असे अनेक किस्से विजय त्या महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये ऐकून होता. विजय अत्यंत स्वाभिमानी, कोणाला उसने पैसे मागील तर नवल. मागच्या महिन्यात मला राधिका वहिनीचा फोन आला. त्यांनी मला सारी परिस्थिती सांगितली. त्या म्हणाल्या, आठ महिन्यांपासून विजयचा पगार झाला नाही. मुलांच्या शिक्षणासाठी, संसारासाठी लागणारा खर्च कुठून करायचा, म्हणून विजय फार टेन्शनमध्ये होता.
दुसऱ्या दिवशी आम्ही विजयच्या अस्थी गोळा करायला स्मशानात गेलो. त्या राखेमध्ये फार अस्थी नव्हत्याच. असे वाटत होते, त्या संस्थाचालकाने खूप सारे शोषण करून विजयची हाडे शिल्लक ठेवलेच नाहीत. इतकं शोषण विजयचे केलं होतं. दोन दिवस विजयकडे राहून मी पुन्हा परभणीवरून मुंबईला जायला निघालो. या काळात विजय सारख्याच असणाऱ्या अनेक केस स्टडी मी अभ्यासल्या. अनेक दिग्गजांशी मी बोललो. मला वाटत होते, आपण समजतो, तेवढा हा विषय साधासुधा नव्हता, तर हा विषय अत्यंत गंभीर होता. ज्यांच्याकडे भरभरून आहे तिथेही शोषण होतं. ज्यांच्याकडे जेमतेम आहे तिथेही शोषण होतं. अशा परिस्थितीमध्ये अडकलेल्या उच्चशिक्षित वर्गाला मदत करण्यासाठी, त्यांचे कुटुंब वाचवण्यासाठी कोणीतरी वाली म्हणून पुढे येणार आहे की नाही, असा प्रश्न मला पडला होता. हाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल बरोबर ना..– संदीप काळे