आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मागे घ्या !
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्र्यांना पत्राद्वारे मागणी
पुणे : प्रसारभारतीने आकाशवाणीच्या पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर (Union Information and Broadcasting Minister Anurag Thakur) यांना पत्राद्वारे केली आहे. (Revoke the decision to close regional news section of Akashvani Pune Centre)
आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन प्रादेशिक वृत्त विभागामार्फत दररोज मराठी भाषेत प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातम्यांचे बातमीपत्र प्रसारित होत असते. प्रसारभारतीद्वारे पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग १९ जूनपासून बंद करण्याचा आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) (Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad)) केंद्रावरून प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्रे (Regional and national news) प्रसारित करण्याचा निर्णय घेतल्याचे समजून अतिशय दुःख झाले. यासोबतच आकाशवाणीच्या विविध भारतीद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्या, पुणे वृत्तांत आणि इतर सर्व बातमीपत्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे श्रोत्यांशी अतूट नाते असून, या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांबद्दल श्रोत्यांमध्ये आत्मियता आहे. या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचे सर्व वयोगटातील श्रोते आहेत. गेली अनेक वर्षे हे श्रोता आणि पुणे केंद्राचे कार्यक्रम यांच्यात अतूट नाते निर्माण झाले आहे. गेल्या दोन पिढ्यांतील सभासदांना आकाशवाणीबद्दल खूप आपुलकी आहे.
यामुळेच आकाशवाणीच्या देशातील विविध केंद्रांपैकी पुणे केंद्राला सर्वाधिक श्रोते मिळाले आहेत. पुणे आकाशवाणी केंद्राच्या श्रोत्यांची संख्या सुमारे २४ लाख आहे. भारत सरकारचे अनेक मंत्री विविध सरकारी प्रकल्पांच्या शुभारंभासाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी दररोज पुण्यात येतात. तसेच केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जी-२० बैठकीसारखे विविध महत्त्वाचे कार्यक्रमही पुण्यात नियमितपणे आयोजित केले जातात. या कार्यक्रमांचे वृत्तांकन करून ते इतर वृत्त विभागांसह दिल्लीला पाठविण्याचे महत्त्वाचे काम या प्रादेशिक वृत्त विभागाकडून केले जाते. ते बंद करण्याच्या निर्णयामुळे पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडींना बातमीपत्रात स्थान मिळण्याविषयी शंका उपस्थित होते. विशेषत: ज्येष्ठ आणि प्रतिष्ठीत नागरिकांमध्ये या निर्णयामुळे प्रचंड नाराजी आहे.