(Khobragade) ‘तो’ शासन निर्णय तात्काळ  रद्द करा ः खोब्रागडे

पुणे : मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात 7 मे 2021 रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय तात्काळ  रद्द करण्यात यावा व मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांना  बिंदूनामावली प्रमाणे पदोन्नती द्या, अशी मागणी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष इ.झेड. खोब्रागडे व सहसचिव डॉक्टर बबन जोगदंड यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कठारे यांच्यामार्फथ मुख्यमंत्री यांना गुरुवारी  निवेदन सादर केले. (Khobragade)

गेल्या काही महिन्यांपासून मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या प्रश्न  राज्यभर गाजत आहे. त्यातच शासनाने या पदोन्नतीच्या संदर्भात आतापर्यंत तीन वेगवेगळे शासन निर्णय काढले आहेत,हे संभ्रम निर्माण करणारे व चुकीचे आहेत. (Khobragade)


या शासन निर्णयामुळे मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. हे शासन निर्णय मागासवर्गीयांसाठी जाणून-बुजून काढण्यात आले आहेत, ते तात्काळ रद्द करून मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना बिंदुनामावलीनुसार तात्काळ पदोन्नती देण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये या प्रश्नी मागासवर्गीयांच्या विविध संघटना एक झाल्या असून त्यांची एक  राज्यव्यापी  आरक्षण हक्क कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.  या राज्यव्यापी फोरमच्या माध्यमातून आज सबंध महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या मागासवर्गीय संघटना आक्रोश निवेदन देऊन मागासवर्गीय आरक्षणाच्या प्रश्नी न्याय मागत आहेत.  मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाऱ्यांची आरक्षणाची मागणी जुनी आहे.

 महाराष्ट्रमध्ये अनेक मागासवर्गीयांची पदे रिक्त असून मागासवर्गीयांना सातत्याने सापत्नभावाची वागणूक शासन देत आहे, त्याचबरोबर मागासवर्गीयांना मोक्याच्या ठिकाणी सुद्धा नेमणूक मिळत नाही, यासाठी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, संविधान फाउंडेशन सातत्याने प्रयत्न करत आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण दिले नाही तर भविष्यामध्ये राज्यव्यापी लढा उभारला जाईल,असा इशाराही  फोरमच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी फोरमच्या पदाधिकारी सुहिता ओव्हाळ, यशदातील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. 

Local ad 1