(MP Rajeev Satav) खा. सातव यांच्यावर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

पुणे :  पुण्याच्या जहाँगीर हॉस्पिटलमध्ये काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव (MP Rajeev Satav) यांचे पुण्यात उपचारा दरम्यान निधन झाले. ते 47 वर्षाते होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून दु:खं व्यक्त होत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून अनेक काँग्रेस नेते आणि राज्यातील नेत्यांनी राजीव सातव यांच्या जाण्यानं शोक व्यक्त केला आहे. सातव यांचे पार्थिव त्यांच्या गावाकडे रवाना झाले असून, उद्या सोमवारी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती राज्यमंत्री विश्विजित कदम यांनी दिली. (MP Rajeev Satav)  

उमद्या नेतृत्वाचं अकाली जाणं क्लेशदायक

राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे. राजीव सातव यांनी आपल्या प्रांजळ स्वभावाने पक्ष, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र जोडले होते. संसदीय प्रणालीवर दृढ विश्वास असणारे आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. त्यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबावर, पक्षावर मोठा आघात आहे, तो सहन करण्याची शक्ती सातव कुटुंबियांना मिळो अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला

काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे  मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्राचा केंद्रातील दुवा हरपला

राजीव सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. त्यांच्या संसदेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. काँग्रेस पक्षातील अतिशय निष्ठावान आणि राहुल गांधी यांचे अतिशय जवळचे सहकारी असलेले सातव यांनी भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले होते. सातव हे काँग्रेस पक्षातील एक उमदा युवा नेतृत्व होते. राज्यातील आणि देशातील तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या सातव यांच्या निधनामुळे देशाने एक युवा संसदरत्न व समाजभुषण व्यक्ती गमावला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केंद्रातील एक दुवा हरपला असल्याची भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

Local ad 1