नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांची कान टोचली !
मराठी कलाकार एकमेकांसोबत त्या आदबीने वागताना दिसत नाहीत. ते एकमेकांना सार्वजनिक ठिकाणीही टोपण नावाने हक मारतात, मग प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील? अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांनी मराठी कलाकारांना शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन कान टोचले आहे.
पिंपरी : मी जेंव्हा इतर भाषेतील कलाकारांना भेटतो तेंव्हा ते एकमेकांना खूप आदराने हाक मारतात. मात्र, मराठी कलाकार एकमेकांसोबत त्या आदबीने वागताना दिसत नाहीत. ते एकमेकांना सार्वजनिक ठिकाणीही टोपण नावाने हक मारतात, मग प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील? अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांनी मराठी कलाकारांना शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन कान टोचले आहे.
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आज राज ठाकरे यांची ‘ नाटक आणि मी’ या विषयावर मुलाखत झाली, यावेळी ते बोलत होते. अभिनेते दीपक करंजीकर यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधला.
यावेळी १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल (100th All India Marathi Drama Conference President Jabbar Patel), अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिन इटकर आदि मान्यवर उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले, पूर्वीच्या काळी मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत अनेक सुपरस्टार होते. मात्र आता केवळ कलाकार राहिलेले आहेत. मराठी कालाकार एकमेकांशी बोलताना टोपण नावाने हाक मारतो. तुम्ही एकमेकांना मान दिला नाही तर प्रेक्षक तुम्हाला मान कसा देतील, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच एकमेकांना मान दिला तर मराठी रंगभूमीला चांगले दिवस येतील असेही ते म्हणाले.
शंभराव्या नाट्य संमेलनात माझ्या मुलाखतीचा विषय ‘नाटक आणि मी’ असा आहे. मात्र मला वाटते मुलाखतीचा विषय ‘मी केलेली नाटकं’ असा हवा होता, अशी मिश्किल टिपणी करत राज ठाकरे म्हणाले, नाटक न पाहीलेला मराठी माणूस सापडणे अवघड आहे. मराठ्यांचा इतिहास पाहिला तर तो नाटक ते अटक असा आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथेच मोठे झाले. आपण राज्यकर्ते होतो पण आपण आपला इतिहास विसरत चाललो आहोत. शंभर फोटो इथे लागले आहेत त्यांना आजची अवस्था बघितल्यावर काय वाटत असेल?
फिल्म मेकिंग हे माझं पहिलं प्रेम आहे, मात्र नाटकाबद्दल माझ्या मनात कायम कुतूहल आहे. चित्रपट, मालिका आणि नाटकं यामध्ये नाटक हे सर्वात आव्हानात्मक माध्यम आहे असे मला वाटते. परदेशात गेल्यावर आपण मोठमोठी नाट्यगृह पाहतो. उत्तम दर्जाची नाटकं पाहतो. ती आपल्याकडे पण व्हायला पाहिजेत. त्यासाठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी प्रस्ताव तयार करावा. तुमची मागणी पूर्ण व्हावी म्हणून मी पुढाकार घेईल, असा शब्द देखील राज ठाकरे यांनी यावेळी दिला.