(Rainy Tourism) पावसाळी पर्यटनाचा बेत आखताय..

कोसळणारा पाऊस, आल्हाददायक कानात शिळ घालणारा वारा आणि दाट धुक्याच्या दुलईमध्ये चिंब भिजत लाईफ साईज सोंगटयांसोबत बुध्दीबळाचा डाव खेळण्यासाठी इथे खास व्यवस्था करण्यात आली आहे. इथे एका मोठया स्टेजवर बुध्दीबळाचा पट तयार करण्यात आला असुन साधारणपणे 4 फुट उंचीची बुध्दीबळाची सोंगटी तयार करण्यात आली आहेत. या पटावर आपल्या परिवारासोबत अविस्मरणीय बुध्दीबळाचा डाव मांडण्याचा दुगधशर्करा योग महामंडळाने खास पर्यटकांसाठी तयार केला आहे. या पटावर ओल्याचिंब पावसात भिजत बुध्दीबळ खेळण्याचे हे गुलाबी क्षण यादगार करण्यासाटी पर्यटकांची चढाओढ सुरु आहे. आपणही या अनोख्या खेळाचा धुक्याच्या आणि उबदार थंडीच्या साथीने आनंद घेता येईल.  त्यासाठी तुम्हांला जावे लागेल. माळशेज घाटात…  त्याविषयी अधिक जाणून घ्या… (Rainy Tourism in pune district mtdc resort)

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास माळशेज घाट- महामंडळाची पुणे विभागातील भिमाशंकर, कार्ला (लोनावळा), पानशेत, कोयनानगर माथेरान आणि माळशेज घाट ही पर्यटक निवासे सुरु असुन त्यापैकीच निसर्गसंपन्न ठिकाणी असलेल्या माळशेज येथे हे पर्यटक निवास आहे. दरीत घुसलेल्या एका पठारावर खाशा पर्यटकांच्या विशेष सोयीसाठी हे पर्यटक निवास बांधण्यात आलं आहे. वेगवेगळया प्रकारचे 46 सुट या पर्यटक निवासात असुन अत्यंत चांगल्याप्रकारे पर्यटकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे.

सध्याचे वातावरण पाहता पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत आहे. उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण, येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा, तसेच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, कर्मचाऱ्यांसाठी मुखपटटी, फेसशिल्ड, हातमोजे इ. व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणुन कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. आगामी काळात कंटाळलेल्या पर्यटकांसाठी ‘वर्क फ्रॉम नेचर’ ही संकल्पना या ठिकाणीही राबविण्यात येणार आहे तसेच“प्री-वेडींग फोटो शुट”, “डेस्टिनेशन वेडींग” यासाठीही विशेष तयारी करण्यात येत आहे. 

जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे. या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो.पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील एक घाट. हा राष्ट्रीय महामार्ग २२३ वरील घाट आहे. इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’. फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून पावसाळी सहल सहज घडेल.

मागे हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात. पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी  नक्कीच माळशेजला जावे. (Rainy Tourism)

Local ad 1