आता प्रत्येक गावातील पाऊस मोजला जाईल.. काय आहे योजना जाणून घ्या

नागपूर : राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतीमध्ये (Gram Panchayat) अद्ययावत पर्जन्य मापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून, पहिल्या टप्प्यात 3 हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायतीत ही यंत्रे बसवण्यात येतील. याद्वारे शेतकऱ्यांना पावसाच्या अचूक माहितीसह, पावसाचे मोजमाप व त्यामुळे झालेल्या नुकसानाची अचूक माहिती मिळेल व त्यानुसार निर्णय घेणे सोपे होईल, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी विधानपरिषदेत सांगितले. (Rainfall in every village will be accurately recorded)

 

 

नियम 97 अन्वये अवकाळी पाऊस व गारपीट यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. यावर उत्तर देतांना मंत्री मुंडे बोलत होते.

 

मुंडे म्हणाले, राज्यात नमो किसान महा सन्मान योजनेतून सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना पहिल्या हफ्त्यापोटी 1720 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. यामधील निकषांमुळे पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी राज्यभर चार महिने विशेष मोहीम राबवण्यात आली. पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया द्यावा लागला तर दुसरीकडे आतापर्यंत सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना अग्रीम 25 टक्के प्रमाणे 2216 कोटी रुपये रक्कम मंजूर करून त्यापैकी आतापर्यंत 1700 कोटींपेक्षा अधिक रक्कमेचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित रक्कमेचे वितरण सुरू आहे. सहा जिल्ह्यातील विमा कंपन्यानी केंद्र सरकार कडे अपील केले असून, ती सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या सहा जिल्ह्यांचा विमा देखील अग्रीम प्रमाणे दिला जाईल. या वर्षी अग्रीम अंतर्गत देण्यात आलेली मदत ही मागील 5 वर्षातील रक्कमेच्या तुलनेत अनेक पटींनी असल्याचे असेही मुंडे यांनी सांगितले.

 

 

अवकाळी व गारपीटीचे अनुदान नवीन घोषणेप्रमाणे वाढीव दराने मंजूर करण्यात येत असून यांतर्गत बाधित शेतकऱ्यांना सुमारे 1458 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे, त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण देखील सुरू केले आहे, असेही मुंडे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, फळपिक विमा, यांसह शासनाने लाभ दिलेल्या अन्य योजनांची देखील आकडेवारी विधानपरिषदेत दिली.

 

 

शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता तपासून आता शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावे यादृष्टीने राज्यात ‘ड्रोन मिशन’ राबविण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठांमधून याबाबतचा स्वतंत्र पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल, असेही मुंडे पुढे म्हणाले.

 

Local ad 1