मनोरंजन क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाची १० एकरामध्ये जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्था – आशिष शेलार
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
पुणे : महाराष्ट्र शासन हे मुंबईतील १० एकर जागेवर मनोरंजन क्षेत्रातील जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्था उभारणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. (Pune International Film Festival 2025 inaugurated)
PMC NEWS । पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात भुसंपादनासाठी यंदा दाेनशे काेटी रुपयांची तरतुद
पुणे फिल्म फाउंडेशन (Pune Film Foundation) आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी (Dadasaheb Phalke Picture City) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पिफ) उद्घाटन आज आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्र नगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, चित्रपट दिग्दर्शक आणि केरळ चित्रपट महोत्सवाचे संचालक शाजी करुण, पुणे फिल्म फाउंडेशनचे सरचिटणीस रवी गुप्ता, विश्वस्त सतीश आळेकर, मोहन आगाशे, इस्तितूतो इटालियानो दी कुल्तुरा, मुंबईच्या संचालिका फ्रांसेस्का अमेंडोला , गोएथे-इंस्टीट्युट मॅक्सम्युलर भवन, पुण्याचे संचालक मार्कस बी शेले, अलायन्स फ्राँसेस, पुण्याचे संचालक अमेली वेइगेल आणि महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय ज्यूरी यावेळी उपस्थित होते.
शेलार पुढे म्हणाले, ” राज्यातील युवकांना मनोरंजन क्षेत्रात मार्गदर्शन मिळावे यासाठी शासन अनिमेशन, व्हिज्युअल, गेमिंग आणि कॉमिक क्षेत्रातील शैक्षणिक (सेंटर ऑफ एक्सलंस) संस्था उभारणार असून त्यामध्ये विविध क्षेत्रातील जगातील तज्ञ येऊन त्यांच्याद्वारे उच्च शिक्षण दिले जाणार आहे.”
विकास खारगे म्हणाले, “पिफ हा आता एक मोठा ब्रँड झाला आहे आणि ती महाराष्ट्राची एक ओळख बनली आहे. चित्रपटांचा राष्ट्राच्या दरडोई उत्पन्नामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामूळे महाराष्ट्र शासन चित्रपटाला विशेष महत्त्व देते आणि त्याच्या विकासासाठी शासन काम करत आहे. चित्रपट महोत्सवामध्ये अनेक संबंधित लोक एकत्र येतात त्यामुळे शासन महोत्सवाला प्रोत्साहन देत आहे. महाराष्ट्र हे चित्रपट चित्रीकरणासाठी उत्तम ठिकाण असून परदेशी चित्रपट निर्मात्यांनी राज्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले. तरुणांनी चित्रपट क्षेत्रात यावे शासन त्यांना सर्व सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. जब्बार पटेल म्हणाले, की राज कपूर यांची यावर्षी जन्मशताब्दी आहे. शोमन राज कपूर ही यावर्षीच्या महोत्सवाची थीम असून राज कपूर यांचे पुण्याशी खास नाते होते. पटेल यांनी यावर्षीच्या संपूर्ण महोत्सवाची माहिती दिली. ते म्हणाले, “दरवर्षी जगभरातील उत्तमोत्तम सिनेमे पुणे चित्रपट महोत्सवात दाखवले जातात आणि नागपूर, लातूर आणि आता ‘नॉर्थ अमेरिका मराठी फिल्म फेस्टिव्हल’, इथे सॅटेलाईट महोत्सव होत आहेत. त्यासाठी ‘कान महोत्सवा’ने, पुणे चित्रपट महोत्सवाला खास बोलावले होते. ”ते म्हणाले, की यावर्षी जगभरातून १५०० चित्रपट आले होते. त्यातून १५० चित्रपट निवडण्यात आले आहेत. पिफ तर्फे लवकरच आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री शुभा खोटे यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’, तर प्रसिद्ध पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना शुभा खोटे म्हणाल्या, की मी गेल्या ७० वर्षांपासून लोकांना हसण्याचे काम करत आहे आणि नायिका होण्यापेक्षा ही भूमिका मी ठरवून पत्करली होती.
कविता कृष्णमूर्ती म्हणाल्या, “मागे वळून बघताना असे वाटते की माझा प्रवास एक स्वप्नं होते आणि मी ते स्वप्नं पूर्ण करण्यासाठी काम केले. यामध्ये अनेक गुरु आणि कुटुंबीय यांची साथ मिळाली.” त्यांनी यावेळी प्यार हुवा चुपकेसे आणि तुमसे मिलकर ना जाने क्यू, असे मुखडे गायले.
महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय ज्यूरी मार्को बेकिस (चिली-इटालियन चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), मार्गारिवा शिल (पोर्तुगीज चित्रपट दिग्दर्शक आणि शिक्षिका), पेट्री कोटविका (फिनिश चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), तामिन्हे मिलानी (इराणी चित्रपट दिग्दर्शक), जॉर्जे स्टिचकोविच (सिनेमॅटोग्राफर सर्बिया), सुदथ महादिवुलवेवा (श्रीलंकन चित्रपट दिग्दर्शक), उर्वशी अर्चना (दक्षिण भारतीय अभिनेत्री), अनिरुद्ध रॉय चौधरी (भारतीय चित्रपट दिग्दर्शक) यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘ग्लोरीया’ (दिग्दर्शिका – मार्गरिटा व्हिसारिओ – इटली, स्वित्झर्लंड) – Gloria’ Director – Margarita Video – Italy, Switzerland हा उद्घाटनाचा चित्रपट (ओपनिंग फिल्म) म्हणून दाखवण्यात आला. तर ‘द रूम नेक्स्ट डोअर’ (दिग्दर्शक – पेद्रो अल्मोडोवर – स्पेन) या चित्रपटाने महोत्सवाची (क्लोजिंग फिल्म) सांगता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी यावेळी सांगितले.
गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. यंदा प्रख्यात चर्मवाद्यवादक विजय चव्हाण आणि सहकारी यांच्या वादनाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानी तालकचेरी हा उस्ताद झाकीर हुसेन यांना आदरांजली वाहणारा कार्यक्रम सादर केला.
१३ ते २० फेब्रुवारी दरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२५’ होत आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (६ स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपट गृहात (२ स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण ११ स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार आहेत.
महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सुरू आहे. रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठी नोंदणी शुल्क रुपये ८०० फक्त आहे.