पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी अनेक नावे चर्चेत, पण एका अधिकाऱ्याला थेट ऑफर !
राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना पुण्यातील कोणत्याही विभागात बदली हवी असते. ती एकवेळ साईट पोस्टिंग असली तरी चालेल. यासाठी अनेकजण मंत्र्यांचे उंबरे झिझवतात. पण एका अधिकाऱ्याला थेट पुण्याचे कलेक्टर व्हावल का ?
पुणे : राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना पुण्यातील कोणत्याही विभागात बदली हवी असते. ती एकवेळ साईट पोस्टिंग असली तरी चालेल. यासाठी अनेकजण मंत्र्यांचे उंबरे झिझवतात. पण एका अधिकाऱ्याला थेट पुण्याचे कलेक्टर व्हावल का ? (Collector of Pune) अशी ऑफर राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Finance Minister and Guardian Minister Ajit Pawar) यांनी दिल्याची चर्चा प्रशासनात आहे. (Pune collector post offer to this IAS officer)
प्रशासनावर अजित पवार यांची पकड मजबूत असून, कामाचा अधिकारी ओळखण्यात ते कधीच चुकत नसल्याची चर्चा आहे. सन २०१४ ते २०१९ ही पाच वर्षे आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत सहभागी होईपर्यंतचा काही काळ हा अपवाद वगळता गेली अनेक वर्षे अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री राहिले आहेत. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त (Pimpri-Chinchwad Municipal Commissioner), जिल्हा परिषद सीईओ (Pune Zilla Parishad CEO), पोलीस आयुक्त ( Pune Police Commissioner) किंवा जिल्हाधिकारी या पदांवर राज्यात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच बसवतात. हे आजपर्यंत दिसून आले आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांची राज्यस्तरावरील आढावा बैठक नुकतीच पुण्यात घेतली. या बैठकीत साताऱ्याचे जिल्हाधिकारी असलेल्या जितेंद्र डुडी (IAS Jitendra Dudy) यांनी सादरीकरण केले. इतर अधिकाऱ्यांच्या तुलनेत हे सादरीकरण प्रभावी ठरले. त्यामुळे पवार यांनी डुडी यांची पाठ थोपटली आणि जाहीरपणे पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी याल का? अशी ऑफर दिली. पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आहेत. त्यांना पुण्यात येऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.
दरम्यान, सन २०१४ मध्ये नागपूर जिल्हाधिकारी म्हणून चांगले काम केल्यानंतर पवार यांनी सौरभ राव यांना पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून आणले. राव यांनी जलयुक्त शिवार, दरड कोसळलेल्या माळीण गावचे पुनर्वसन, पालखी मार्गांचे विस्तारीकरण आणि मतदारयाद्यांची दुरुस्ती ही महत्त्वाची कामे त्यांनी प्रभावीपणे केली आहेत. तसेच अकोला येथील जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांना देखील पवार यांनीच पुण्यात सीईओ म्हणून आणले होते. त्यांनी देखील सीईओ म्हणून चांगले काम केले. तर सध्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी गेल्या साडेतीन वर्षांत केलेली कामगिरीही कौतुकास पात्र आहे.