पुणे : आंबेगाव (ता. मुळशी) येथे लागलेल्या आगीमुळे शनिवारी (दि. २२) दुपारी १२.४४ वाजता महापारेषणच्या पिरंगुट-कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आले. त्यामुळे हिंजवडीमधील २०० आयटी उद्योगांसह हिंजवडी, वाकड, पिरंगुट, भुकुम, भुगाव, पौड, मुठा खोरे, कोळवण खोरे (Hinjewadi, Wakad, Pirangut, Bhukum, Bhugaon, Paud, Mutha Valley, Kolvan Valley) आदी परिसरातील घरगुती, व्यावसायिक व इतर सुमारे ९० हजार २०० ग्राहकांचा वीजपुरवठा ४३ मिनिटे बंद होता. (Power outages hit 90,000 customers, including 200 IT industries in Hinjewadi)
आंबेगाव (ता. मुळशी) येथील टेकड्यांच्या परिसरात आज लहानमोठ्या झाडाझुडपांना आग लागली होती. या ठिकाणी असलेल्या महापारेषणच्या पिरंगुट-कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाबाच्या टॉवर लाइनखाली ही आग पसरल्यानंतर या लाइनमध्ये ट्रिपिंग आले. परिणामी महावितरणच्या पिंपरी विभागातील १३ व मुळशी विभागातील १८ अशा ३१ उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला व वीजयंत्रणेत १८२ मेगावॅटची तूट निर्माण झाली.
यामुळे हिंजवडी फेज १ ते ३ मधील २०० आयटी उद्योग तसेच वाकड परिसर, पिरंगुट, भुगाव, भुकूम, उरावडे, कासारआंबोली, पौड, मुठा खोरे, कोळवण खोरे, लवळे, कोठावडे आदी परिसरातील ९० हजार घरगुती, व्यावसायिक व इतर ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. महापारेषणच्या वरिष्ठ अभियंत्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर ४३ मिनिटांनी या सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला.