Acb Parbhani Case । परभणी : महसुली गावात महसूल विभागाचा पोलिस पाटील प्रतिनिधी असतो. गावात होणाऱ्या गैर कारभार किंवा एखाद्या गुन्ह्याची माहिती पोलिसांनी देणे आणि महसूल विषयक कामांमध्ये तलाठ्याला मदत करण्याची जबाबदारी असते. मात्र, गावात सुरु असलेल्या पाणंद रस्त्यासाठी गौण खनिजाची वाहतूक करु देण्यासाठी 1 लाख 25 हजारांची लाच मागितली. तडजोडीनंतर 50 हजारांची लाच घेताना पोलिस पाटील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. (Police patil of Vadgaon station caught by ACB while taking bribe of Rs 50 thousand)
पोलिस पाटील रामेश्वर काशिनाथ बचाटे (Police Patil Rameshwar Kashinath Bachate) (वय 35 वर्षे,वडगाव स्टेशन, ता.सोनपेठ जि. परभणी राहणार वडगाव स्टेशन ता.सोनपेठ जि.परभणी) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर पोलिस पाटलांचे नाव आहे. तसेच खासगी व्यक्ती वैजनाथ सुंदरराव बचाटे (वय 74 वर्षे, राहणार वडगाव स्टेशन ता.सोनपेठ जि.परभणी) अटक केली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने दिलेल्या माहितीनुसार वडगाव स्टेशन ग्रामपंचायत कडून चार पांदण रस्त्याचे काम सध्या सुरू आहेत. 42 वर्षिय तक्रारदार यांच्याकडे असलेल्या हायवा ट्रॅक व त्यांचे मामा कडील जेसीबीने ते दोघे मुरूम व विहिरी मधून निघालेला पाषाण दगड रस्त्यावर टाकून रस्त्याचे काम केले जात आहेत. 21 मार्च 2025 रोजी वडगाव (स्टे.) गावचे पोलीस पाटील रामेश्वर बचाटे हे तक्रारदार यांना भेटून म्हणाले की, “तुमचे हायवा आणि जेसीबीने तुम्ही दोघे गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक करीत आहात. तुम्ही मला प्रत्येकी 5000 रुपये प्रमाणे दोघांचे 10000 रुपये दर दिवशी द्या, नाही तर ही माहिती मी पोलीस स्टेशन आणि तहसील ऑफिसला देईल. त्यामुळे तुमच्यावर गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल होईल. तक्रारदार यांना पोलीस पाटील रामेश्वर बचाटे हे मागत असलेली रक्कम लाच असल्याने ती त्यांना देण्याची इच्छा नाही. अशी तक्रार 23 मार्च रोजी एसीबी परभणी येथे दिली.
तक्रारीची पडताळणी 23 मार्च रोजी पंचासमक्ष करण्यात आली. पडताळणीत पोलिस पाटील रामेश्वर बचाटे यांनी एकूण चार पांदण रस्त्याचे कामासाठी दीड लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती प्रथम 50 हजार रुपये आणि नंतर 75 हजार रुपये असे 1,25,000 रुपयाची मागणी केली. लाचेची रक्कम खाजगी इसम वैजनाथ बचाटे यांचेकडे देण्यास सांगून लाच रक्कम स्विकारण्यास सहमती दिली. 4 एप्रिल रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी वैजनाथ सुंदरराव बचाटे यांनी तक्रारदार यांच्या कडून लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता 50,000 रुपये स्वतः स्विकारला. आरोपी वैजनाथ सुंदरराव बचाटे यांना लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले असून लोकसेवक रामेश्वर काशिनाथ बचाटे यांना देखील ताब्यात घेण्यात आले. आरोपीची अंग झडती घेण्यात आली. त्यामध्ये रोख रक्कम मिळून आली. आरोपी वैजनाथ सुंदरराव बचाटे यांचे अंगझडती मध्ये लाचेची रक्कम 50,000 रुपये आणि 01 मोबाईल फोन मिळून आला आहे. तर आरोपी पोलिस पाटील रामेश्वर बचाटे आणि आरोपी वैजनाथ बचाटे यांचे निवासस्थानाची घरझडती सुरू आहे. पोलिस पाटील रामेश्वर बचाटे यांच्याविरुद्ध कलम 7, 7 A भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम आणि आरोपी वैजनाथ बचाटे यांचेविरुद्ध कलम 7-A, 12 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे पो.स्टे.गंगाखेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप पालवे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनात परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी यांच्या पथकाने केली. पथकामध्ये ASI निलपत्रेवार, पो.अंमलदार नामदेव आदमे, राम घुले,कल्याण नागरगोजे, चालक पोह कदम व नरवाडे यांचा सहभाग होता.