दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा खुलासा अन् चौकशीचे आदेश ते रुग्णालयाची तोडफोड ; दिवसभर काय घडले जाणून घ्या !
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची एकूण चार स्थरावर चौकशी सुरू
पुणे, उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या गर्भवती महिलेला पैसे जमा केल्याशिवाय उपचार नाकल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याप्रकरणी शुक्रवारी दिवसभर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर आंदोलनकरून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तर रुग्णालयाच्या नावाला काळे फासण्यात आले. तत्पुर्वी राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Minister of State Madhuri Misal) यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. तर, भिसे कुटूंबियांनी अलंकार पोलिसांत रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची एकूण चार स्थरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केल्यानंतर पुणे महापिलेकने देखील पालिका स्थरावर चौकशी समिती नेमली. दुसरीकडे धर्मादय आयुक्त कार्यालयाने रुग्णालयाच्या “आर्थिक व्यवहारांची चौकशीसाठी समिती गठीत करून चौकशी सुरू केली.दरम्यान, रुग्णालयाने अतंर्गत चौकशी केली. त्यातून त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडत रुग्णानेच हलगर्जी केल्याचा दावाकरून आपली बाजू खरी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. (Order for inquiry Deenanath Mangeshkar Hospital)
शुक्रवारी सकाळपासूनच दीनानाथ रुग्णालयावर राजकीय पक्षांचे मोर्चे येऊ लागले. युवक काँग्रेसच्या अक्षय जैन तसेच सौरभ अमराळे, प्रथमेश आबनावे, उमेश पवार, भूषण रानभरे, आनंद दुबे व अन्य कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या फलकाला काळे फासले, त्यावर शाई फेकली. असाच प्रकार शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या महिला आघाडीने केला. भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष हर्षदा फरांदे तसेच स्नेहल दगडे, पूनम चौधरी, आरती कोंढरे, उज्ज्वला गौड, स्वाती मोहोळ, रेणुका राठोड, भावना शेळके यांनी रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिले व चौकशीची मागणी केली. या आंदोलनाच्या वेळी प्रशासनाचा निषेध म्हणून प्रवेशद्वारावर चिल्लर फेकण्यात आली. या आंदोलकांचा सामना करताना रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांची त्रेधातिरपीट उडाली.
आंदोलकांकडून घोषणा देण्यात येत होत्या. काही जण रुग्णालय प्रशासनाचा निषेध करणारे फलक घेऊन आले होते. ते फडकावण्यात येत होते. प्रवेशद्वारावर बरीच गर्दी झाली. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या रुग्णांची अडचण झाली. त्यांना जाण्या-येण्यासाठी रस्ताच मिळेना. सुरक्षा रक्षकांकडून वारंवार रस्ता मोकळा ठेवण्याबाबत सांगण्यात येत होते, मात्र कोणीही आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पालेकर यांनाही कोणी दाद देत नव्हते. काही जणांनी मोडतोड करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवरही यामुळे मोठा ताण आला. दुपारनंतर आंदोलनांचा जोर ओसरला व रुग्णालय प्रवेशद्वार पूर्वस्थितीवर आले.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून या घटनेची लगेच दखल घेण्यात आली. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी चौकशी समिती स्थापन केली असल्याची घोषणा केली व तशी पोस्टही केली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही दोषी असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल, असे समाजमाध्यमांवरून जाहीर केले. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीही पोलिस आयुक्त तसेच महापालिका आयुक्त यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगणारे पत्र दिले.
आंदोलनांबरोबरच समाजमाध्यमांवरही अनेकांच्या पोस्ट व्हायरल झाल्या. राष्ट्रवादीचे (शरद पवार) राज्य प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुग्णालय प्रशासनाचा निषेध केला. दीनानाथची जागा सरकारने नाममात्र भाडेपट्ट्याने दिलेली आहे. रुग्णालयाची उभारणीही जाहीर कार्यक्रमांमधून जनतेने दिलेल्या पैैशांमधून झाली आहे. त्याचा उल्लेख जवळपास प्रत्येक पोस्टमध्ये करण्यात येत होता. काही जणांनी रुग्णालयांशी संबंधित स्वत:चे अनुभवही पोस्ट केली. सरकारने रुग्णालय ताब्यात घ्यावे, अशी मागणी होत होती.
गुलाबो गॅंगचे आंदोलन
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो काही प्रकार झाला, तो फार भयानक आहे. मृत्युमुखी पडलेल्या आईला न्याय मिळालाच पाहिजे. १० लाख रुपये भरले नाही म्हणून तुम्ही रुग्णाला दाखल करून घेत नसाल आणि त्याला मरणाच्या दारात सोडत असाल तर चॅरिटी हॉस्पिटल मृत्यूची चॅरिटी करत आहे का ? असा प्रश्न उपस्तिथकरून गुलोबा गँगने तीव्र आंदोलन केले. सरकारकडून जमिनी लाटायच्या, चॅरिटी रुग्णालय चालवायला पैसे घ्यायचे आणि सामान्य रुग्णाला मरणाच्या दारात सोडायचे. ह्या मुजोर प्रशासनाला शिक्षा मिळाली पाहिजे. गुलाबो गॅंग ही अन्यायाविरुद्ध कायम राहणार असून, मुलांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे संगिता तिवारी यांनी म्हटले. यावेळी सोनिया ओव्हाळ, सीमा महाडिक, मनिषा गायकवाड, भीमा आंबेकर व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
पोलिसांत तक्रार दाखल
भिसे कुटूंबिय तसेच भाजप आमदार अमित गोरखे यांनी गुरूवारी रात्री उशिरा याप्रकरणाबाबत अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मृत्यूला जबाबदार रुग्णालय व त्यातील काही डॉक्टर असल्याचे या तक्रारीत म्हंटले असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत पुणे पोलिसांकडून तक्रारीची चौकशीकरून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.
काय आहे रुग्णालयाचा खुलासा – What is the hospital’s disclosure?
रुग्णालयाने अतंर्गत चौकशीकरून याबाबत शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यात विविध दावे करण्यात आले असून, यामध्ये तनिषा भिसे २०२० मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होत्या. २०२२ मध्ये त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली आहे. त्यात ५० टक्के सवलत दिली होती. तनिषा भिसे यांची प्रसूती सुखरूप होण्याची शक्यता नसल्याने मुल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता, असा दावा रुग्णालयाने या अहवालात करण्यात आला आहे. आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपुर्व तपासणी कमीत-कमी तीन वेळा करणे आवश्यक असते. मात्र, या तपासणी भिसे यांनी केल्या नसल्याचेही या अहवालात रुग्णालयाने म्हटले आहे. तसेच, १५ मार्च रोजी भिसे या इंदिरा आयव्हीएपचे रिपोर्ट घेऊन डॉ. घैसास यांची भेट घेतली होती. त्याचवेळी घैसास यांनी भिसे यांना अतिशय धोकादायक गर्भधारणे बाबत माहिती दिली होती. तसेच, त्यांना सात दिवसांनी तपासणीसाठी बोलावले होते, असा दावा करत रुग्णालयाने मृत्यूप्रकरणात केला आहे.
कुटूंबियांकडून रुग्णालयाच्या दाव्याची पोलखोल…
दीनानाथ मंगेशकर हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी उपचारांसाठी गेलो होतो. रूग्णालाय प्रशासनाचा अहवाल खोटा असून यामधून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे भिसे कुटूंबियांनी म्हंटले. त्या दिवशी आम्हाला दोन ते तीन तासांमध्ये उपचार मिळाले नाही. पेशंटसमोर तुम्ही २० लाख रुपये मागता. १० लाख डिपॉझिट करण्यास सांगितले. ते दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांच्याकडे कधी गेलो नाही, असे सांगितले जात असले तरी आम्ही आधी गेल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यांनी ७ दिवसांनी आमच्याकडे फॉलोआपला यायला सांगितले. २ एप्रिलला बोलावले होते. जर काही त्रास वाटला तर तुम्ही अॅडमिट देखील होऊ शकता असे देखील सांगितले होते. हे जर खोटे वाटत असेल तर त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे. माझ्या भावाचे कॉल रेकॉर्डिंग चेक करा. रुग्णालयाने विनाकारण लोकांची दिशाभूल करू नये.
डॉ. घैसास यांच्या वडिलांच्या रुग्णालयाची तोडफोड
भाजप महिला आघाडीच्या वतीने सुश्रुत घैसास यांच्या वडिलांचे अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड करीत निषेध नोंदविला. झाडाच्या कुंड्या फेकून देत नासधूस केली. रुग्णालयाच्या तोडफोडीनंतर घैसास यांच्या आई डॉ. नीलिमा घैसास म्हणाल्या सुश्रुत घैसास हा माझा मुलगा आहे. पण त्याचा या रुग्णालयाशी काही संबंध नाही. विनाकारण आमच्या रुग्णालयाची तोडफोड केली. विनाकारण आमच्या परिवाराला त्रास दिला जात आहे. मी आणि माझे पती तसेच दुसरा मुलगा ४० वर्षापासून रुग्णालय चालवत आहोत, तसेच त्यांने रुग्णालयाच्या नियमानुसार पैसे मागितले असतील, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.