Pune Zilla Parishad | पुणे जिल्हा परिषदेत 26 विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना काम करण्याची संधी
Pune Zilla Parishad पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गुणवंत आणि होतकरू अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील अजून २६ विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजना अंतर्गत, तीन वर्षासाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती कार्यालयामध्ये इंटर्न म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
Pune Zilla Parishad | पुणे : हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे समाजातील बरेचसे होतकरू आणि गुणवंत विद्यार्थी हे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. बारावी नंतर पारंपारिक पद्धतीने महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पदवी मिळवू इच्छिणारे विद्यार्थी हे हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण अर्धवट सोडतात , अशा विद्यार्थ्यांना पुढील पदवी शिक्षणाची संधी मिळावी आणि शिक्षण घेत असताना त्यांचे अर्थार्जन सुद्धा व्हावे ही आज महत्वाची सामाजिक गरज आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी कमवा – शिका योजनेतून विद्यार्थ्यांना प्रशासकीय कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी दिले जाते. (Opportunity to work for 26 students while studying in Pune Zilla Parishad)
पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सध्या विविध योजनांचे तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध मिशनमोड वरील समाजोपयोगी प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर चालू आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि कालसुसंगत असा उपयुक्त वापर करून कार्यालयीन कामकाजामध्ये गतिमानता आणणे आणि प्रलंबित कार्यालयीन कामकाजाचा विहित मुदतीमध्ये निपटारा करणे ही आता सर्व शासकीय कार्यालयांची मोठी गरज बनलेली आहे.
Related Posts
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बारावी पास असलेल्या आणि पुढील पदवी शिक्षण पूर्ण करू इच्छिणार्या होतकरू आणि गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी आवश्यक ते सर्व ज्ञान – कौशल्ये ही त्यांच्या दैनंदिन कामातून मिळावीत, असे प्रत्यक्ष कृतीशील शिक्षण घेताना त्यांना ३ वर्षासाठी निश्चित विद्यावेतन सुद्धा मिळावे यासाठी जुलै २०२० पासून जि. प. सेस फंडातून नावीन्यपूर्ण योजना राबविली जात आहे. या योजनेमधून गेल्या तीन वर्षामध्ये अनेक होतकरू आणि गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे बाहेर पडले असून काही विद्यार्थी हे सध्या लाभ घेत आहेत. याचाच पुढील टप्पा म्हणून म्हणून, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गुणवंत आणि होतकरू अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील अजून २६ विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजना अंतर्गत, तीन वर्षासाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती कार्यालयामध्ये इंटर्न म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
योजनेच्या लाभाचा तपशील
दरवर्षी निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील विविध विभागांमध्ये किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये, तीन वर्षासाठी प्रशासकीय काम करण्याची आणि पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विविध ज्ञान- कौशल्ये आत्मसात करून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थ्याने केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी रु. ८,०००/- दुसर्या वर्षी रु. ९,०००/- आणि शेवटच्या वर्षासाठी रु. १०,०००/- इतके विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल. तसेच निवास व भोजन हेतू प्रतिमाह रु. ४,०००/- इतका निर्वाह भत्ता सुद्धा देण्यात येईल. सुरवातीच्या टप्प्यामध्ये पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन गुणवंत विद्यार्थ्याची निवड यामध्ये केली जाणार असून (संबंधित तालुक्यातून पुरेसे होतकरू व गुणवंत विद्यार्थी न मिळाल्यास इतर तालुक्यांमधून घेतले जातील) सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले काम आणि स्वयंअध्ययन (Self-Learning) यातून तिसर्या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची (IGNOU) बीबीए म्हणजेच Bachelor in Business Administration (Services Management ही कामातून पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे प्रमाणपत्र असा विद्यार्थ्याचा दुहेरी फायदा होणार आहे.
योजना अटी आणि शर्ती
१) लाभार्थी हा पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
२) लाभार्थी विद्यार्थी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील व बारावी पास असावा. (पदवी शिक्षण पूर्ण नसणाऱ्या किंवा काही कारणास्तव पदवी शिक्षण अर्धवट राहिलेल्या आणि ते पूर्ण न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.)
३) दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी लाभार्थ्याचे वय हे १८ ते २४ वर्षे दरम्यान असावे.
४) लाभार्थी हा संगणक साक्षर असावा. उत्तमरीत्या संगणक हाताळणार्या आणि संगणकाचा कोणत्याही कार्यालयीन कामामध्ये चपखलपणे वापर करण्याची हातोटी असलेल्या विद्यार्थ्याचा निवड करतेवेळी प्राधान्याने विचार केला जाईल.
५) बीबीए पदवी अभ्यासक्रमासंदर्भात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या नियम आणि अटींचे लाभार्थ्याला पालन करावे लागेल.
६) इंटर्न म्हणून काम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत निवड पत्र मिळाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाची प्रथम वर्ष रु. १४,५००/-, द्वितीय वर्ष रु. २०,०००/- आणि तृतीय वर्ष रु. २०,०००/- या प्रमाणे ३ वर्षे फी ही स्वत: भरावयाची आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने बीबीए (सर्व्हिस मॅनेजमेंट) या कार्यआधारित पदवी अभ्यासक्रमासाठी संबंधित विद्यार्थ्याची प्रवेश निश्चिती केल्यावरच इंटर्नशिप सुरू होणार आहे. प्रवेश निश्चितीकरिता संबंधित विद्यार्थ्याला सुरवातीला प्रथम वर्ष फी १४,५०० रुपये हे भरावे लागतात त्या अनुषंगाने विद्यार्थ्याची तयारी हवी. तसेच आपली द्वितीय आणि तृतीय वर्षाची फी सुलभरित्या वेळेत भरता यावी यासाठी दर महिना मिळणार्या विद्यावेतनातून संबंधित विद्यार्थ्याने थोडी थोडी बचत करणे अपेक्षित आहे.
७) सलग तीन वर्षे इंटर्नशिप सुरू राहावी यासाठी विद्यार्थ्याने संबंधित पदवीच्या तीनही वर्षाला आपले प्रवेश विहित मुदतीमध्ये निश्चित करणे आवश्यक असते. जर विद्यार्थी हा एखाद्या वर्षी काही कारणास्तव फी न भरता आल्याने संबंधित वर्षाकरिता आपला प्रवेश निश्चित करू शकला नाही तर संबंधित विद्यार्थ्याची जिल्हा परिषदेमधील इंटर्नशिप ही तत्काळ संपुष्टात येईल. सबब प्रत्येक वर्षी निश्चित केलेल्या प्रवेशाचा पुरावा विद्यार्थ्याला त्या त्या वर्षी जिल्हा परिषदेला सादर करावा लागेल.
८) कामाच्या संदर्भात पुणे जिल्हा परिषदेने वेळोवेळी घालून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करण्याची जबाबदारी ही संबंधित विद्यार्थ्याची असेल. सदर नियमांचे पालन न झाल्यास अथवा समाधानकारक काम नसल्यास अशा विद्यार्थ्याची कार्यालयीन सेवा कधीही थांबविण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला असेल.
९) सदर योजना ही तीन वर्षानी बीबीए पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यास पुणे जिल्हा परिषदेमध्ये कायमस्वरूपी अथवा कंत्राटी स्वरूपाच्या नोकरीची ऑफर / आश्वासन देत नाही.
१०) इंटर्नशिपसाठी रुजू होतेवेळी विद्यार्थी उमेदवाराने, पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने दिलेले निवडपत्र काळजीपूर्वक वाचावे. आणि त्यातील दिलेले नियम आणि अटी व शर्तींचे पदवी अभ्यासक्रम पूर्ण होई पर्यन्त काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. निवड केलेल्या लाभार्थ्याने इंटर्नशिप अर्धवट सोडून जाऊ नये म्हणून निवड झाल्यानंतर १ महिन्याच्या आत बंधपत्र करून देणे आवश्यक आहे.
११) सदर योजनेअंतर्गत निवड केलेल्या लाभार्थ्यास कोणत्याही नियमित पदावर हक्क सांगता येणार नाही. तसेच सदर निवडीच्या आदेशाने त्यांना कोणत्याही न्यायालयात वा प्राधिकरणाकडे जिल्हा परिषदेच्या सेवेत नियमित करण्यास्तव दाद मागता येणार नाही.
१२) इंटर्नच्या निवड संख्येमध्ये वेळोवेळी बदल करण्याचे सर्वाधिकार हे पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने राखून ठेवलेले आहेत.
आवश्यक कागदपत्रे:
१) आधार कार्ड (पुढील आणि मागील बाजू)
२) पॅन कार्ड
३) जात प्रमाणपत्र
४) शिधापत्रिका (मागील आणि पुढील बाजू)
५) दहावी उतीर्ण प्रमाणपत्र
६) बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
७) MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास श्रेयस्कर आणि प्राधान्य
निवड प्रक्रियेचे संभाव्य कालबद्ध कार्यक्रम:
१. पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने उपलब्ध करून दिलेल्या पुढीललिंकवर https://tinyurl. com/zppunebba2024 वर जाऊन स्वारस्य (इच्छुक असल्याबाबत) अर्ज करावा. ०५ जानेवारी २०२४ पर्यंत
२. इच्छुक विद्यार्थ्यांची एमकेसीएल आणि इग्नू च्या वतीने एक पात्रता परीक्षा घेतली जाईल आणि पात्रता परीक्षेतील विद्यार्थ्यांचे गुण हे पुणे जिल्हा परिषदेला कळविले जातील. पात्रता परीक्षा देण्यासाठी संबंधित इच्छुक विद्यार्थ्यांनी https://ignou. mkcl.org या साईटवर जाऊन आपले लॉगीन तयार करणे आवश्यक आहे. दिनांक २० डिसेंबर २०२४ पासून ते दिनांक ०५ जानेवारी २०२४ दरम्यान
३. जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यापीठाच्या नियमांनुसार स्वारस्य अर्ज भरलेल्या आणि पात्रता परीक्षा दिलेल्या निवडक अशा गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची प्रारंभिक पडताळणी केली जाईल तसेच कागदपत्रांची यशस्वी पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांचे संगणक कौशल्य पडताळून पाहण्यासाठी तज्ञ संस्थेच्या मदतीने एक छोटी परीक्षा घेतली जाईल. दिनांक १५ जानेवारी २०२४ पर्यंत
४. चांगले संगणक कौशल्ये असलेल्या संबंधित विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या निवड समितीमार्फत त्याच दिवशी प्रत्यक्ष मुलाखतीला बोलावले जाईल आणि जिल्हा परिषदेच्या निवड समिती मार्फत ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे त्यातील निवडक होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना ३ वर्षाच्या इंटर्नशिप करिता निवडले जाईल. दिनांक १५ जानेवारी २०२४ पर्यंत
५. निवड झालेल्या सर्व इंटर्न ची नावे IGNOU च्या बीबीए (सर्व्हिसेस मॅनेजमेंट) या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्ज प्रक्रियेसाठी एमकेसीएल या संस्थेला कळविली जातील. दिनांक २० जानेवारी २०२४ पर्यंत
*इंटर्नच्या निवड संख्येमध्ये वेळोवेळी बदल करण्याचे सर्वाधिकार हे पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने राखून ठेवलेले आहेत.
५. निवड झालेल्या सर्व इंटर्नचे एमकेसीएल मार्फत IGNOU च्या ignou.mkcl.org या अधिकृत वेबसाइटकरिता लॉगिन तयार केले जाईल व त्या वेबसाईटच्या माध्यमातून पदवी प्रवेशासाठी आवश्यक प्रारंभिक अर्ज प्रक्रिया पार पाडली जाईल. दिनांक २५ जानेवारी २०२४ पर्यंत
६. इंटर्नशिप करिता निवड झालेल्या सर्व इंटर्न ला पदवीसाठीच्या प्रारंभिक अर्ज प्रक्रियेनंतरच्या पुढील टप्प्यावर आवश्यक असणारे ऑफर लेटर (निवड पत्र) जिल्हा परिषदेच्या वतीने निर्गमित केले जाईल. दिनांक २८ जानेवारी २०२४ पर्यंत
७. इंटर्नशिप करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यानी ignou.mkcl.org या IGNOU च्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांची IGNOU मार्फत योग्य ती पडताळणी होईल. IGNOU तर्फे पात्र विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाची फी भरण्याबाबत कळविले जाईल. फी भरल्यानंतरच बीबीए (सर्व्हिस मॅनेजमेंट) या पदवी अभ्यासक्रमाला IGNOU च्या वतीने संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होईल. दिनांक ३१ जानेवारी २०२४ पर्यंत
८. निवड झालेल्या आणि प्रवेश निश्चित केलेल्या सर्व इंटर्न ला जिल्हा परिषद, पुणे किंवा पंचायत समित्या येथील विविध कार्यालयीन कामांची तोंडओळख करून दिली जाईल. दिनांक १ फेब्रुवारी २०२४ ते ०४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान
९. इंटर्नशीप करिता जिल्हा परिषदेच्या वतीने निवडलेल्या आणि IGNOU तर्फे प्रवेश निश्चित झालेल्या संबंधित इंटर्न विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामध्ये प्रत्यक्ष कामावर म्हणजेच जिल्हा परिषद मुख्यालयात अथवा पंचायत समिती मुख्यालयात पुढील ३ वर्षांकरिता रुजू करण्यात येईल. ०५ फेब्रुवारी २०२४ पासून