...

अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे दार सामान्यांसाठी सतत उघडे ठेवावे – निरंजन कुमार सुधांशू

राज्‍यसेवेतील १४४ अधिकाऱ्यांचे यशदामध्ये पायाभूत प्रशिक्षण

पुणे : शासकीय अधिकाऱ्यांकडे काम घेऊन येणाऱ्यांसाठी त्‍या अधिकाऱ्यांनी उपलब्‍ध असले पाहिजे. त्‍याचबरोबर लोकांमध्ये जाऊन त्‍यांच्या समस्‍या जाणून घेऊन त्‍यांच्या सूचना विचारात घेऊन त्‍या पद्धतीने कामकाज करायला हवे. त्‍याचबरोबर अधिकाऱ्यांनी आपल्‍या कार्यालयाचे दार सामान्यांसाठी सतत उघडे ठेवावे, असे आवाहन यशदाचे महासंचालक निरंजनकुमार सुधांशू यांनी केले. महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाकडून नियुक्‍त झालेल्‍या राज्‍यसेवेतील वर्ग -१ च्या १४४ अधिकाऱ्यांच्या १० व्या एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) तुकडीचे पायाभूत प्रशिक्षण आजपासून यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) Yashwantrao Chavan Development Administration Academy मध्ये सुरु झाले. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी सुधांशू बोलत होते. (Officials should keep their office doors open to the public.)

 

 

AI चा प्रशासनात प्रभावीपणे वापर ;  सायबर सिक्युरिटी अवेअरनेसाठी प्रशिक्षण

राज्‍याच्या सामान्य प्रशासन विभागाने महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्‍यसेवा परीक्षेतून सरळसेवेने नियुक्‍त होणाऱ्या गट ‘अ’ व गट ‘ब’ मधील अधिकाऱ्यांसाठी एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) सन २०१४ पासून लागू केला आहे. यामध्ये एकूण ३३ संवर्गातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी जसे मसुरीच्या लालबहादूर शास्‍त्री राष्‍ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले जाते त्‍याच धर्तीवर यशदामध्ये हे प्रशिक्षण होत आहे.

 

गट ‘अ’ अधिकाऱ्यांसाठी यशदा व गट ‘ब’ अधिकाऱ्यांसाठी नागपूर येथील वनामती येथे पायाभूत प्रशिक्षण घेतले जाते. यावर्षी गट ‘अ’ चे १४४ अधिकारी यशदामध्ये प्रशिक्षणासाठी उपस्‍थित झाले आहेत. त्‍यामध्ये उपजिल्‍हाधिकारी-१९, तहसीलदार-१४, पोलिस उपअधीक्षक / सहायक आयुक्‍त-२१, सहायक आयुक्‍त विक्री कर-३०, उपनिबंधक सहकारी संस्‍था-२, गटविकास अधिकारी-७, महाराष्‍ट्र वित्त व लेखा अधिकारी–६, नगरपालिका मुख्याधिकारी–१, शिक्षणाधिकारी–१३, प्रकल्‍प अधिकारी / सहाय्यक आयुक्‍त आदिवासी विकास–४, महिला व बालविकास अधिकारी-१७ असे १४४ अधिकारी आहेत.

 

दि. २ एप्रिल २०२५ ते २७ मे २०२५ पर्यंत ५६ दिवस म्‍हणजेच ८ आठवडे हे प्रशिक्षण आहे. उद्घाटनप्रसंगी यशदाचे अतिरिक्‍त महासंचालक शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad, Additional Director General, Yashda), उपमहासंचालक पवनीत कौर, उपमहासंचालक डॉ. मल्‍लिनाथ कल्‍लशेट्टी, या प्रशिक्षणाचे सत्रसंचालक तथा उपमहासंचालक मंगेश जोशी यांची उपस्‍थिती होती. यावेळी पुढे बोलताना महासंचालक सुधांशू म्‍हणाले, अधिकाऱ्यांनी आपल्‍याकडे काम घेऊन येणाऱ्या सामान्य लोकांचे प्रश्न ऐकून घेऊन त्‍यांच्याशी विनम्रपणे बोलले पाहिजे, वागले पाहिजे, प्रसंगी कधीकधी न्यायाची भूमिका घेताना चौकटीबाहेर जाऊन सुद्धा काम केले पाहिजे. त्‍याचबरोबर अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामे वेळेत करून वेळेचे व्यवस्‍थापनही केले पाहिजे.

 

प्रारंभी सत्रसंचालक मंगेश जोशी यांनी एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाची सविस्‍तर रुपरेषा सांगितली. या प्रशिक्षणादरम्‍यान महाराष्‍ट्र दर्शन, दिल्‍ली भेट, शासकीय कार्यालयातील संलग्‍नता, तांत्रिक प्रशिक्षण, उजळणी प्रशिक्षण याचा पायाभूत प्रशिक्षणात समावेश असल्‍याचे त्यानी सांगितले. प्रशिक्षणाचा भाग म्‍हणून या पायाभूत प्रशिक्षणादरम्‍यान प्रशासकीय कामकाजास पूरक ठरणारी पदव्युत्तर पदवी ‘मास्‍टर ऑफ आटर्स इन डेव्हलपमेंट ॲडमिनिट्रेशन’ ही पदवी उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना गोखले राज्‍यशास्‍त्र आणि अर्थशास्‍त्र संस्‍था तसेच यशदा व वनामती यांच्या संयुक्‍त विद्यमाने देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात लोकप्रशासन, कायदा, व्यवस्‍थापन या व अन्य उपयुक्‍त ठरणाऱ्या विषयांचे प्रशिक्षण विविध क्षेत्रातील तज्ञ यांच्यामार्फत यशदा देणार आहे. सहसत्रसंचालक वीणा सुपेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. किरण धांडे यांनी केले. तर आभार रेश्मा होजगे यांनी मानले.

 

Local ad 1