पुणे : काश्मीरमध्ये तीन ठिकाणी होणाऱ्या गणवशोत्सवासाठी पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांच्या बाप्पाच्या मुर्ती विधीवत पूजा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे प्रदान करण्यात आल्या. कश्मीर खोर्यात शांतता नांदावी, (Restless peace in troubled Kashmir) सर्व धर्मीय एकोप्याने राहावे, याकरिता युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या पुढाकारातून पुण्यातील सात गणपती मंडळांच्या सहकार्याने सलग दुसऱ्या वर्षी काश्मीर खोऱ्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. (Offering Ganesh idols to three Ganesh Mandals in Kashmir Valley)
काश्मीर मधील लाल चौकात गत वर्षी दिड दिवसांचा गणेशोत्सव साजरा झाला होता. यंदा तीन ठिकाणी हा उत्सव साजरा होणार आहे. या तीन गणेश मंडळांना शनिवारी पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती विधीवत पुजा करून सुपूर्द करण्यात आल्या. मानाच्या दुसर्या तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची प्रतिकृती कश्मीरमधील लाल चौकातील गणपतीयार ट्रस्टला गणेशाची मूर्ती सुपूर्द केली. तर मानाचा तिसर्या गुरूजी तालीम गणेश मंडळाची प्रतिकृती कुपवाडा येथील गणेश मंडळाला सुपुर्द करण्यात आली. तसेच, मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणेश मंडळाची प्रतिकृती साऊथ काश्मीर अनंत नाग येथील गणेश मंडळाला सुर्पूर्द करण्यात आली. कश्मीर खोर्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी मोहित भान, संदीप रैना, संदीप कौल, नितीन रैना यांच्याकडे या मुर्ती प्रदान करण्यात आल्या.
यावेळी युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Head of Utsav Puneet Balan) यांच्यासह मानाच्या कसबा गणपती श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम प्रविण परदेशी, तुळशीबाग गणपती विकास पवार, नितीन पंडीत, केसरी वाडा अनिल सपकाळ तसेच पुण्यातील प्रसिध्द अखिल मंडई मंडळाचे आण्णा थोरात उपस्थित होते. साऊथ काश्मीर अनंत नाग येथील गणेश मंडळ येथे यंदा 5 दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे.
अखिल मंडई मंड़ळाचे आण्णा थोरात म्हणाले, आपला गणेशोत्सव जगात पोहोचला. मात्र, अशांत काश्मीरमध्ये हा गणेशोत्सव फक्त पुनीतजी बालन यांच्यामुळे पुन्हा सुरु होत आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन! काश्मीरमध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात. ज्या प्रमाणे पुण्यातील गणेशोत्सवाची मुहुर्त मेढ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी रोवली, त्याप्रमाणेच कश्मीरमधील गणेशोत्सवाची मुहुर्त मेढ पुनीत बालन यांनी रोवली आहे.
कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे म्हणाले, काश्मीर भारताचे नंदनवन आहे. यंदा पुन्हा पुनीतजींच्या माध्यमातून हा गणेशोत्सव साजरा होत आहे. याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. पुण्यातील गणेशोत्सवाची परंपरा त्यांनी कश्मीरपर्यंत पोहचवण्याचे मोठे काम केले आहे.
कश्मीर येथील गणपतीयार गणेश मंडळाचे मोहित भान म्हणाले, गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि पुनीतजींचे सहकार्य म्हणून आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतोय, याचा आम्हाला आनंद आहे. या गणेशोत्सवामुळे येथील सर्वधर्मिय लोक एकत्र येतील, आणि या अशांत परिसरात शांतता नांदेल.
संदीप रैना म्हणाले, काश्मीरमध्ये पहिल्यांदा अनंत याग येथे गणेशोत्सव साजरा करतोय, या उत्सवामध्ये आमच्या येथील महाविद्यालयीन तरुण सहभागी होणार आहेत, बहुतेक तरूण महाराष्ट्रातच शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या गणेशोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळेल, असे मला वाटते.
पुण्यातील प्रमुख सात गणपती मंडळाच्या सहकार्याने गतवर्षी कश्मीरमधील लाल चौक येथून गणेशोत्सवाला सुरूवात झाली. दहशतवादी कारवाईची कोणतीही भीती न बाळगता या मंडळाचे कायकर्ते माझ्याकडे आले आणि शांततेसाठी असलेली ही चळवळ पुढे नेण्याची त्यांनी विनंती केली. त्यांनीच यंदा काश्मीरमध्ये तीन ठिकाणी हा उत्सव साजरा करण्याची विनंती केली होती. यामुळे पुण्याची सांस्कृतिक परंपरा जपणारा हा उत्सव कश्मीरमध्ये साजरा होत आहे. त्याचा कश्मीर खोर्यात विस्तार होतोय, याचा मला आनंद आहे. या गणेशोत्सवामुळे काश्मिर शांतता नांदो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना करतो.
– पुनीत बालन, उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट