...

इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये :  खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

पुणे : आपला इतिहास सर्वांपर्यंत अजूनही योग्य तऱ्हेने पोहोचत नाही. आज इतिहासात बदल कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करत आहेत. खरा इतिहास बदलता येणार नाही आणि कोणी इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले. (No one should try to change history : MP Shrimant Shahu Maharaj Chhatrapati)

 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे (Smt. Laxmibai Dagdusheth Halwai Dutt Temple Trust) देण्यात येणारे  गुरु महात्म्य पुरस्कार बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे (Senior historical researcher Pandurang Balkawade) आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर (Founder President of Lokmanya Multipurpose Society Dr. Kiran Thakur) यांना प्रदान करण्यात आले. त्यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती बोलत होते. यावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड (Dr. Vishwanath Karad, Founding President of MIT World Peace University), श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सेक्रेटरी अण्णा थोरात, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते. पुणे बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. हेमंत झंझाड आणि प्रख्यात रंगावलीकार प्रा. अक्षय शहापूरकर यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

श्री दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, महावस्त्र व रुपये २५,०००/- असे पुरस्काराचे स्वरुप होते. पुरस्कारांचे हे ३० वे वर्ष असून मंदिराचे यंदा १२७ वे वर्ष चालू आहे. सकाळ समुहाचे व्यवस्थापकीय संचालक  अभिजीत पवार हे काही कारणास्तव उपस्थित राहू न शकल्याने त्यांना नंतर हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

 

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, भारत हा जुन्या संस्कृतीचा देश आहे. ती संस्कृती आपण जपत आहोत. मात्र, त्यातील उणीवा आपण दूर करायला हव्या. भावी पिढी या उणीवांपासून लांब राहिल, असे म्हणण्यापेक्षा नवीन पिढीला योग्य दिशा द्यायला हवी. सर्वाना सोबत घेऊन जायला हवे. हीच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांची शिकवण होती.

 

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, अध्यात्म्य आणि विज्ञान हा विषय घेऊन जगासमोर भारतमाता विश्वगुरू कशी होईल, हे पाहायला हवे. स्वामी विवेकानंद यांचे विचार पाहिले की स्वत्व, स्वाभिमान आणि स्वधर्म याची आठवण होते. भारतीय संस्कृती, परंपरा आणि धर्म हे समजण्याकरिता अशा प्रकारचे उपक्रम प्रेरणादायी आहेत.

 

पुरस्काराला  उत्तर देताना डॉ. किरण ठाकूर म्हणाले, गुरु या संज्ञेला महत्व आहे. गुरुचे स्थान हे राजापेक्षा देखील मोठे आहे. मला स्वातंत्र्यलढ्याचा वारसा माझ्या आई-वडिलांकडून मिळाला.  महाराष्ट्राच्या सीमा भागात आणि गोव्यामध्ये मराठी अवहेलना होता आहे, अशा ठिकाणी मराठी संस्कृती जागविण्याचे काम आम्ही करणार आहोत.

 

पांडुरंग बलकवडे म्हणाले, कळत्या वयापासून ज्याची आराधना केली. त्या दत्तमहाराजांच्या नावाचा पुरस्कार आज मिळाला असून हा भाग्याचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणादायी आहे. संतांनी महाराष्ट्राला विचारधारा दिली आणि संस्कृतीतून समाज टिकवून ठेवला. त्यामुळे हाच गौरवशाली इतिहास जगासमोर यावा, हे आद्य कर्तव्य मानून कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजेंद्र बलकवडे यांनी स्वागत केले. अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी आभार मानले.

 

Local ad 1