प्रशासनात आमूलाग्र बदलाची गरज : उमाकांत दांगट

पुणे : प्रशासकीय व्यवस्थेकडे प्रत्येक जण संशयाच्या नजरेने पाहतो आहे. अलीकडे गुड गव्हर्नन्स ऐवजी बॅड गव्हर्नन्स ही संकल्पना उदयास येत आहे. त्यासाठी प्रशासनाने लोकांचा विश्वास संपादन करून लोकांच्या जीवनात आनंदाची निर्मिती करण्याच्या संकल्पनेसाठी झटले पाहिजे, यासाठी प्रशासनात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन औरंगाबादचे माजी विभागीय महसूल आयुक्त उमाकांत दांगट यांनी केले. (The need for radical development of the administration: Umakant Dangat)

 

 

महाराष्ट्र विकास सेवेतील सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांनी लिहिलेल्या व स्वयंदीप प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘ग्रामीण विकासातील माझे प्रयोग’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी दांगट बोलत होते.

 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे माजी विभागीय महसूल आयुक्त तथा मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर (Chief Minister’s Adviser Dr. Deepak Mhaisekar) यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (Yashada’s Deputy Director General Dr. Mallinath Kalashetti), डॉ.बबन जोगदंड (Dr. Baban Jogdand) यांची उपस्थिती होती.

 

 

दांगट म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिक आनंदी कसा राहील, यासाठी प्रशासन व्यवस्थेने तसे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. भूतानमध्ये जशी आनंदाची संकल्पना आहे, तशी संकल्पना आपल्या देशात सुद्धा राबवून लोकांना आपल्या जीवनात आनंद कसा प्राप्त होईल, यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अलीकडे प्रशासनाच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये अविश्वासाचे व दुःखमय वातावरण निर्माण होत आहे. हे घातक आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘गुड गव्हर्नन्सचे वातावरण निर्माण करण्यासाठी काम करावे.मात्र अलीकडे प्रशासनाने आपले प्राधान्यक्रम बदललेले आहेत. त्यामुळे लोकांचा प्रशासनावरील विश्वास उडत चालला आहे.

 

 

गणेश चौधरी यांनी हे पुस्तक लिहून ग्रामविकासाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक म्हणजे आधुनिक ग्रामगीता आहे. काही सनदी अधिकारी प्रशासनात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवतात, पण काही अधिकाऱ्यांचा कुठेच ठसा दिसत नाही, ही शोकांतिका आहे, असेही ते म्हणाले.

 

 

यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रशासनामध्ये काम करताना वाद करायचा की संवाद वाढवून पुढे जायचे याचे तंत्र समजून घेऊन त्या दिशेने अधिकाऱ्यांनी वाटचाल करावी,असे आवाहान केले. आता इन्फोटेक आणि बायोटेक हे एकत्रित झाल्याने नवीन आव्हाने आपल्यासमोर उभी राहिली आहेत. अलीकडील पिढीला कुठल्याही प्रकारचा संघर्ष करावा लागत नाही. ते कम्फर्ट झोनमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना पूर्वीचा काळ माहीत नाही. आता तंत्रज्ञानाने त्यांची चिंता संपुष्टात आणली आहे. असेही ते म्हणाले.

 

यावेळी यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गणेश चौधरी यांनी विकास प्रशासन सेवेत हिरीरीने काम केले असून त्यांनी हागणदारीमुक्ती, वसुंधरा प्रकल्प, व निर्मल ग्राम अभियान यामध्ये मोठे योगदान दिले आहे. शिक्षण आरोग्य व उपजीविका या क्षेत्रामध्येही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अत्यंत गतिशील अधिकारी म्हणून चौधरी यांची ओळख असून त्यांनी लिहलेले हे ग्रामीण विकासातील पहिलं पुस्तक असावं असे ते म्हणाले.

 

प्रास्ताविकात डॉ. बबन जोगदंड म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासामध्ये विकास सेवेतील अधिकाऱ्यांचे भरीव योगदान असून गणेश चौधरी यांनी आपल्या ३४ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून या खात्यामध्ये आपला लौकिक निर्माण केला. ते उत्तम संघटक,संवादक, धाडसी आणि नेतृत्वगुण असणारे कृतिशील अधिकारी आहेत.त्यामुळे त्यांचे अनुभव हे येणाऱ्या पिढीसाठी दिपस्तंभ ठरतील, असे सांगितले.

 

 

प्रारंभी गणेश चौधरी यांनी आपल्या मनोगतात हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विशद केली. आपण सामान्य कुटुंबातून शिक्षण घेऊन महाराष्ट्र विकास सेवेच्या माध्यमातून जशी जमेल तशी ग्रामीण जनतेची सेवा केली. वेगवेगळे विकासाचे कार्यक्रम राबून तळागाळापर्यंत अनेक योजना पोहोचवल्या, त्याचा लेखाजोखा या पुस्तकात मांडल्याचे ते म्हणाले.

 

या कार्यक्रमात पुस्तकाच्या संपादनासाठी मदत करणारे व्यंकटेश कल्याणकर यांचा गौरव करण्यात आला.

Local ad 1