Nanded news । नांदेड उत्पादन शुल्क विभागाचा बीड जिल्ह्यात छापा, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोहा तालुक्यातील आष्टुर येथे बनावट मद्यसाठा जप्त

Nanded news । नांदेड : राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे बनावट विदेशी मद्याविरूद्ध मोहिम हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील आष्टुर येथे बनावट मद्यसाठ्यासह आरोपीला जागेवरच अटक केली. आष्टूर येथे आरोपी पंडीत मारोती गोटमुकले याच्या ताब्यातील आष्टूर येथील पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल 547 बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. यात 180 मिली देशी दारूच्या 144, 90 मिली क्षमतेच्या 96, बनावट मॅकडॉन नं 1 नावाच्या विदेशी मद्याच्या 106, रॉयल स्टॅग नावाच्या 21 अशा एकुण 547 मद्यपेयासह बॉटल्स, जिओ कंपनीचा ॲन्ड्रॉइड मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Nanded Excise Department raids in Beed district)

 

राज्य उत्पादन शुल्‍क विभागाच्या पथकाने ही मोठी कारवाई आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अतुल कानडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये देगलूर अ विभागाच्या पथकामार्फत ही प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली.

बीड जिल्ह्यातही पथकाने केली मोठी कारवाई

आरोपी पंडीत गोटमुकले याने सदर बनावट विदेशी मद्य हे अंबेजोगाई तालुक्यातील मोजे साकुड येथून हा बनावट माल खरेदी करत असल्याची माहिती दिली. आरोपीच्या माहितीवरून सदर ठिकाणी ही राज्य उत्पादन शुल्क पथकाने आरोपीसह साकुड येथे छापा टाकला. या छाप्यात तब्बल 3 हजार 229 बनावट मद्य पेयासह असलेल्या बॉटलचा साठा आरोपीसह जप्त केला. यात 180 मिलीच्या बनावट मद्याच्या मग्‍डोवेल नंबर 1 च्या 144 बॉटल्या, रॉयल स्टॅग विक्सीच्या बनावट 192 बाटल्या, गोवा येथून विक्रीसाठी आणलेल्या इम्पेरिअल ब्ल्यूच्या 480 सीलबंद बाटल्या, रॉयल चॉलेंजच्या 528 बाटल्या, रॉयल क्लासिकचे 750 एमएलच्या 96 बाटल्या, अड्रील क्लासिकच्या 60 सीलबंद बाटल्या, विदेशी मद्याचे 25 लेबल, विदेशी मद्याचे 1 हजार 499 बनावट बुचे, रॉयल चॉलेंज विस्किच्या 205 रिकाम्या बाटल्या, विवोचा ॲन्ड्रॉइड मोबाईल, एक चार चाकी सुमो वाहन, एक दुचाकी (स्कुटी) असा एकुण 8 लाख 53 हजार 583 इतक्या किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. आरोपी महादेव उर्फ अण्णा धारमोड रा. दौनापूर तालुका परळी याला तेथून अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार सदर बनावट मद्य व मद्य निर्मिती करण्याकरीता लागणारे साहित्य आरोपी जावेद युनूस इनामदार रा. यरमाळा ता. कळंब याने पुरविल्याचे सांगितले. सदर आरोपी जावेद हा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

 

 

 

जवान विकास नागमवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुय्यम निरीक्षक आर. डी. सोनवणे यांनी महाराष्ट्र दारू बंदी कायद्याच्या कलम 65 (A), (B), (D), (E), (F), 80, 81, 83,90, भारतीय दंड विधानचे कलम 328 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.

 

 

वरील दोन्ही गुन्ह्यात नांदेड उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अतुल कानडे (Superintendent of Nanded Excise Department Atul Kanade) यांच्या प्रत्यक्ष उपस्थित निरीक्षक एस. एस. खंडेराय, ए. एम. पठान, आशिष महिंद्रकर, दुय्यम निरीक्षक राजकिरण सोनवणे, अनिल पिकले, एस. टी. कुबडे, बी. बी. इथर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बालाजी पवार, शिवाजी कारनुळे, विकास नागमवाड, जी. डी. रेनके, श्रीनिवास वजिराबादे, मुरलीधर आनकाडे, जवान खतीब फाजील, संतोष संगेवार यांचा सहभाग होता.

येथे करा तक्रार..

अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्रि क्रमांक 1800 233 9999 व व्हॉटसॲप क्र. 8422001133, दूरध्वनी क्र. 02462-287616 वर संपर्क करावा, असे आवाहन अधिक्षक अतुल कानडे यांनी केले.
Local ad 1