पुणे : जगातील काही देशात मंकीपॉक्स (Monkeypox) रुग्ण आढळत असून, त्या देशातून राज्यात येणार्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासंदर्भात राज्याच्या साथरोग विभागाने मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. (State issues guidelines to districts)
केंद्रीय आरोग्य खात्याच्या राष्ट्रीय रोग निवारण केंद्राने याबाबत राज्याला सूचना जारी केल्या आहेत. मंकीपॉक्स बाधित देशांतून प्रवास केलेल्या नागरिकांवर तसेच संशयित लक्षणे असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवा. जर असे काही असेल तर या संशयित रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान केंद्र (National center for virology (niv) pune) तपासणीसाठी पाठवा, असे सांगितले आहे.
संशयित किंवा निदान झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. याप्रकरणी केंद्राकडून राज्याला शनिवारी मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सर्व जिल्हयांना या सूचना देण्यात आल्या आहेत. मंकीपॉक्स् चा प्रसार हा कोरोनापेक्षा खूप कमी असून, या रुग्णाच्या जास्त जवळून संपर्कात आल्यासच त्याची बाधा होऊ शकते.
-डॉ. प्रदीप आवटे, मुख्य साथरोग अधिकारी, महाराष्ट्र.
काय आहेत सूचना
मंकीपॉक्स बाधित देशांतून गेल्या 21 दिवसांत जे प्रवासी आपल्याकडे आले आहेत. त्यांच्या अंगावर पुरळ आली असेल तर त्यांना आरोग्य केंद्रात विलगीकरणात ठेवा. संशयित रुग्णांच्या अंगावरील पुरळचे द्रव्य, रक्त आणि थुंकीचे नमुने एनआयव्ही ला पाठवण्यात यावेत. रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या 21 दिवसांमध्ये संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात यावा. रुग्णांना आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्यात यावेत व जोपर्यंत त्वचेचा संसर्ग पूूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत विलगीकरण संपवू नये.
ही आहेत लक्षणे..
मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून मानवामध्ये पसरलेला एक विषाणू आहे. तो प्राण्यांपासून माणसांत किंवा माणसापासून माणसात पसरू शकतो. ताप येणे, अंगावर पुरळ येणे आणि लिंफनोड ला सूज येते. याची लक्षणे 2 ते 4 आठवडयांपर्यंत राहतात.