(MAPS) १ लाख युवकांना मिळणार प्रशिक्षण : नवाब मलिक
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्यातील युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (Maharashtra Apprenticeship Promotion Scheme – MAPS) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेतंर्गत चालू वर्षात राज्यातील विविध उद्योग, आस्थापना यामध्ये १ लाख युवकांना ॲप्रेंटीसशीपची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पुढील पाच वर्षात ५ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेतून रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मलिक यांनी सांगितले. (Maharashtra Apprenticeship Promotion Scheme – MAPS)
या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५ हजार रुपये यापैकी कमी असलेले विद्यावेतन दिले जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना उपयोगी पडतील अशा ७१५ व्यवसायांना ही योजना लागू केली आहे, असे त्यांनी सांगितले.
मलिक म्हणाले, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील युवक-युवतींना रोजगारक्षम करुन प्रत्येक हाताला काम देणे हे शासनाचे ध्येय आहे. राज्यातील किमान दहावी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी व अनुभव उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवार भरतीसाठी आस्थापनांना प्रोत्साहित करुन पाच वर्षात ५ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुण प्रशिक्षित होतील. त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीही प्राप्त होतील. (Maharashtra Apprenticeship Promotion Scheme – MAPS)