...

Kharif season। खरीप हंगामातील पेरणीची घाई करु नका : कृषि आयुक्त सुनील चव्हाण

Kharif season । पुणे : यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना विशेष दक्षता घ्यावी तसेच पेरणी संदर्भात नियोजन करावे. साधारणत: ८० ते १०० मि. मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner Sunil Chavan) यांनी केले आहे.

 

 

आपत्कालीन पीक परिस्थितीत शेतकऱी बांधवांनी कशा प्रकारची काळजी घ्यावी यासंदर्भात कृषि मंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली. याबैठकीत कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव, सर्व कृषि विद्यापिठांचे कुलगुरु त्याचप्रमाणे भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. हौसाळीकर (Indian Meteorological Department Senior Scientist K. S. Hausalikar)आदी उपस्थित होते.

 

हवामान बदलानुसार सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. त्यामुळे नवीन सामान्य पाऊस कालावधी (न्यू नॉर्मल मान्सून पिरीयड) हा २४ ते २५ जून असेल असा अंदाज वेधशाळेने सांगितला आहे. या हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४-२५ जूननंतर अरबी समुद्रावरुन येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याने सर्वत्र चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक नियोजनासंदर्भात योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे.

 

योग्य पीक नियोजन या नवीन सामान्य पाऊस कालावधीचा विचार करता शेतकऱ्यांनी पेरणी करताना लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. पाऊस उशीरा आल्यामुळे शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करु नये. पेरणीसाठी साधारणपणे २० टक्के जादा बियाणांचा वापर करावा. सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी. त्याप्रमाणे जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादन सारख्या तंत्राचा वापर करावा.

 

 

हवामान खात्यामार्फत पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज दिला जातो. या पावसाच्या अंदाजाची माहिती प्रसिद्धी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येईल. कृषि विद्यापीठ, कृषि विद्यापीठांचे संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र यांच्या सहाय्याने स्थानिक आपत्कालीन पीक नियोजन करण्यात येणार आहे. क्षेत्रीय यंत्रणांना या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना कृषि विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

 

राज्यात मान्सूनचा अंदाज (Monsoon forecast) घेऊन पेरणीच्यावेळी पुरेशा प्रमाणात उत्तम दर्जाचे बी-बियाणे, खते व किटकनाशके शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार व रास्त दरात उपलब्ध करुन देण्याची खबरदारी कृषि विभागाकडून घेण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कृषि निविष्ठांचा साठा उपलब्ध होईल यासाठी क्षेत्रीय यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून १८००-२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असेही कृषी आयुक्त चव्हाण यांनी कळविले आहे.

Local ad 1