पुणे. कार्यकर्त्यांचा लवाजमा, नावे लिहलेल्या टोप्या, बॅनर, पोस्ट आणि समर्थनाच्या घोषणा अशा प्रकारे जोरदार शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर व जिल्ह्यातील इच्छुकांनी बुधवारी विधानसभेसाठी मुलाखती दिल्या. यामध्ये पुणे शहरातील खडकवासला मतदार संघातून सर्वाधीक नऊ आणि जुन्नर मधून आठ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. विशेष म्हणजे बारामती विधानसभेसाठी एकाही इच्छुकाने मुलाखत दिलेली नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार, (NCP President Sharad Pawar) खासदार सुप्रिया सुळे, खा. डॉ. अमोल कोल्हे (Mp Supriya Sule, Dr. Amol Kolhe), माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदींनी या मुलाखती घेतल्या. (Interview given by 33 aspirants from Pune district from NCP Sharadchandra Pawar)
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. महायुती, महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपासाठी बैठकांवर बैठका सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्व विधानसभा मतदार संघातून इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत. इतर राजकीय पक्षाच्या पुढे एक पाऊल टाकत पक्षाच्या वतीने पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात कोकण वगळता राज्यातील सर्वज भागातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पुणे शहर व जिल्ह्यातील इच्छुकांच्या बुधवारी मुलाखती घेण्यात आल्या.
सकाळी सव्वा दहा वाजता खडकवासला विधानसभा मतदार संघासाठी सचिन दोडके, अनिता इंगळे, सोपान चव्हाण यांच्यासह 9 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर शिवाजी नगरमधून अॅड. निलेश निकम, श्रीकांत पाटील, उदय महाले यांच्यासह 7, पर्वती साठी अश्विनी कदम, सचिन तावरे यांच्यासह 4, हडपसरमधून शहराध्यक्ष प्रशांत जगताप, बंडू गायकवाड यांच्यासह 4, वडगांवशेरी 6, कोथरुड 2, पुणे कॅन्टोनमेंट 4 आणि कसबा पेठेतून रविंद्र माळवदकर अशा एकून 37 इच्छुकांच्या मुलाखती झाल्या.
शहरातील मुलाखती झाल्यानंतर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यामध्ये जुन्नर मधून शरदराव लेंडे, अनिल तांबे यांच्यासह आठ इच्छुकांच्या मुलाखती झाल्या, आंबेगाव मधून देवदत्त निकम, शेखर पाचंदकर पाटील यांच्यासह 4, खेड-आळंदीमधून अतुल देशमुख, अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, सुधीर मुंगसे, रामदास ठाकूर, अनिल राक्षे यांच्यासह 7, शिरूरमधून आमदार अशोक पवार, अरुण नरके, सूर्यकांत पलांडे, दौंडमधून डॉ. वंदना मोहिते, नामदेव ताकवणे, अप्पासाहेब पवार, पुरंदरमधून संभाजी झेंडे, इंदापूरमधून 4, भोर 2, मावळ 1 अशा 33 जणांनी मुलाखती दिल्या.
घोषणाबाजी, बॅनर, पोस्टर आणि कार्यकर्त्यांच्या जवाजम्यासह इच्छुक मुलाखतीसाठी आले होते. यावेळी खेड-आळंदीमधून इच्छुक असणारे अतिल देशमुख आणि सुधीर मुंगसे यांनी यावेळी चांगलेच शक्तीप्रदर्शन केले. आजवर मी केलेले काम आणि शरद पवार यांच्याशी असलेल्या निष्ठेमुळे मलाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास मुलाखत देवून बाहेर येणारे इच्छुक बोलून दाखवत होते.
जगदाळे – माने यांची अनुपस्थिती
इंदापूर विधानसभा मतदार संघातून अप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने यांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज केला आहे. मात्र, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिट्टी देवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने जगदाळे व माने नाराज आहेत. खा. सुप्रीया सुळे व शरद पवार यांच्याकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून भूमिका जाहीर करण्याची घोषणा जगदाळे व माने यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या मुलाखतींकडे जगदाळे व माने यांनी पाठ फिरविली.
कोणत्याही चिन्हावर लढण्यास तयार
मी जुन्नर मधून विधानसभा लढण्याची पूर्ण तयारी केली आहे. मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणुक लढमार आहे. हा विधानसभा मतदार संघ काँग्रेसला सुटला नाही तर मी महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणुक लढण्यास तयार आहे. मात्र, निसर्ग मंगल कार्यालयात मी मुलाखतीसाठी नाही तर बिबट्याच्या प्रश्नावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट घेण्यासाठी आलो आहे.
– सत्यशील शेरकर, जुन्नर