पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, नांदोशी, नांदेड, धायरी (Kirkatwadi, Nandoshi, Nanded, Dhayri) या गावांमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) अधिक रुग्ण सापडत असल्याने राजाराम पूल ते खडकवासला दरम्यान महापालिका हद्दीतील भागाला बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी घरोघरी जाऊन महापालिकेकडून सर्वेक्षण केले जात आहे. ८५ पथके त्यासाठी नेमली आहेत. नागरिकांनी घाबरू नये, यासाठी पथकांकडून जनजागृतीही केली जात आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यास यश मिळत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे (Pune Municipal Corporation Health Department Head Dr. Nina Borade) यांनी दिली.(GBS affected area declared between Rajaram Bridge and Khadakwasla!)
पीएमआरडीएचे संकेतस्थळ होणार अद्यावत – PMRDA website to be updated
मेंदूविकार तज्ज्ञांनी महापालिकेच्या रुग्णालयात सेवा
महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचारांची सुविधा दिली जाणार आहे. या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेकडे मेंदूविकार तज्ज्ञ (न्यूरोलॉजिस्ट) महापालिकेकडे नसल्याने उपचारात अडचणी येणार होत्या. मात्र, महापालिकेने केलेल्या आवाहनानंतर चार मेंदूविकार तज्ज्ञांनी महापालिकेच्या रुग्णालयात सेवा देण्याची तयारी दाखविली आहे. एका डॉक्टरांच्या सेवेला सुरुवातही झाली आहे.
रुग्णांच्या मदतीसाठी नोडल अधिकारी
जीबीएसच्या रुग्णांची माहिती एकत्र करण्यासाठी तसेच रुग्णांना महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या योजनेचा फायदा घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शहरातील रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त केली आहे. एका अधिकाऱ्याकडे २ ते ३ रुग्णालयांची जबाबदारी दिली आहेत. रुग्णांची माहिती गोळा करणे, त्यांना कोणत्या योजनेत लाभ देता येईल, याची माहिती देणे या सेवा त्यांना द्याव्या लागणार आहेत. रुग्णांच्या शौच नमुने आणि पाणी नमुने यांची शंभर टक्के तपासणी केली जात आहे. तसेच, बाधित गावांमध्ये मेडीक्लोरच्या बाटल्यांचे वाटप महापालिकेकडून करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ६०० बटल्यांचे वितरण केले आहे. साधारण ३० हजार घरांमध्ये हे वाटप केले जाणार आहे.
शहरी गरीब योजनेचा फायदा मिळणार
जीबीएसच्या रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. तसेच, या बाधित क्षेत्रातील रुग्णांना महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी शहरी गरीब योजनेचा निधी एक लाखावरून दोन लाख करण्यात आला आहे. जे नागरिक शहरी गरीब योजनेत पात्र होत नाही, त्यांनाही एक लाखांची मदत महापालिकेच्या वतीने उपचारांसाठी केली जाणार आहे. यासाठी महापालिकेकडे अर्ज सादर करावा लागणार आहे व हमीपत्र द्यावे लागणार आहे. या योजनेचा लाभ १३ जानेवारीनंतर दाखल झालेल्या रुग्णांना दिला जाणार आहे.
पुण्यात ‘जीबीएस’चे १०३ रुग्ण
राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्या १११ वर पोहोचली असून, आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक १०३ रुग्ण पुण्यात असून, १३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्णसंख्येत वाढ सुरूच असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने बाधित भागात रुग्ण सर्वेक्षण करण्यावर भर दिला आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ७७ पुरुष आणि ३४ महिला आहेत. सर्वाधिक रुग्ण पुणे परिसरात असून, त्यात पुणे महापालिका २०, पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेला भाग ६६, ग्रामीण ५, पिंपरी-चिंचवड महापालिका भागात १२, आणि इतर जिल्ह्यांतील ८ रुग्ण आहेत. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ३१ रुग्णांचे जीबीएसचे निश्चित निदान झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.