शेतकऱ्यांना परदेशात जाऊन शेतीचा अभ्यास करण्याची संधी ; करावा लागेल अर्ज, कशी आहे प्रक्रिया समजुन घ्या !
शेतीविषयक तंत्रज्ञान (Agricultural Technology) व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्याचे देशाबाहेर दौरे आयोजित केले जाणार आहेत.
पुणे : विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान (Agricultural Technology) व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्याचे देशाबाहेर दौरे आयोजित केले जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना ३१ जानेवारी २०२४ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला भेट देऊ माहिती घ्या.. (Opportunity for farmers to go abroad to study agriculture)
शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विस्तार कार्यक्रमाद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध पिकांची उत्पादकता, पीक पध्दतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, कृषि उत्पादनांचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषि प्रक्रियेमधील अद्ययावत पद्धती यामध्ये आमुलाग्र बदल आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
कोणत्या देशात जाऊ शकता..
जर्मनी, फ्रांस, स्पेन, स्वित्झरलंड, ऑस्ट्रीया, न्यूझीलंड, नेदरलंड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर (Germany, France, Spain, Switzerland, Austria, New Zealand, Netherlands, Vietnam, Malaysia, Thailand, Peru, Brazil, Chile, Australia, Singapore) आदी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे.
कोण करु शकतो अर्ज
अभ्यास दौऱ्याकरिता लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. त्याच्या नावे चालू कालावधीचा ७/१२ व ८-अ उतारा असावा. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयंघोषणापत्र (प्रपत्र १) अर्जासोबत सादर करावे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जासोबत आधार पत्रिकेची प्रत द्यावी.शेतकरी किमान बारावी उत्तीर्ण असावा. शेतकऱ्याचे वय २५ ते ६० वर्षे असावे. शेतकरी वैध पारपत्रधारक असावा. दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.
कोण करु शकत नाही अर्ज
शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीत नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार इ. नसावा. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा.
परदेश दैऱ्याच खर्च शासन किती करणार ?
शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरीता सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रु. १ लाख रुपये प्रती लाभार्थी यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान देण्यात येईल. शेतकऱ्याचे त्याचे बँकचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर दौऱ्याचा १०० टक्के खर्च प्रवासी कंपनीकडे आगावू स्वतः भरावा लागेल व दौरा पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम खात्यावर जमा करण्यात येईल.