पुणे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections) लवकरच घोषणा होणार असून, सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष तिकडे लागले आहे. मात्र, या घोषणा होण्यापूर्वीच राज्यात काही जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या तारखा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील 29 हजार 429 निवडणुका सध्या प्रलंबित असून, गेल्या काही महिन्यांपासून त्या सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहेत. आता, विधानसभा निवडणुकांचे कारण देत ह्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे, सहकारी (Sahkar) क्षेत्रातील निवडणुकांचा गुलाल उधळण्याअगोदर विधानसभा निवडणुकांचा गुलाल उधळण्यात येईल, हे निश्चित झालं आहे. (Election of 7 thousand 109 cooperative societies postponed again)
सध्या राज्यातील 7 हजार 109 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. साधारण नोव्हेंबर महिन्यात या निवडणुकांच्या तारखा ही जाहीर झाल्या होत्या. त्यामध्ये, दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँक व पतसंस्थांच्या (Milk Union, Market Committee, District Bank and Credit Institution) निवडणुका घेण्यात येणार होत्या. मात्र, राज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाने या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे, 31 डिसेंबर 2024 नंतरच या निवडणुका होणार आहेत. राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक (Election of Co-operative Societies) प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 73 कब मधील तरतुदी नुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राबविण्यात येते. ज्याअर्थी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या कार्यालयाकडून 4 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पत्राव्दारे शासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार सन 2024-25 या वर्षात राज्यातील 29,429 सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असून त्यापैकी 7,109 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.
जून, 2024 मध्ये राज्यातील पावसाची परिस्थिती विचारात घेऊन शासनाने 20 जून 2024 रोजीच्या आदेशान्वये राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुका आणखी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सन 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभा निवडणूक पूर्वतयारीसाठी तसेच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी सहकार विभागातील अधिकारी / कर्मचारी यांची सेवा अधिग्रहित केल्यास सहकारी संस्थांच्या निवडणूका पार पाडण्यात येणाऱ्या अडचणी विचारात घेता राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलणे उचित होईल, अशी शासनाची धारणा आहे.
31 डिसेंबरपर्यंत निवडणुका पढेराज्यातील 250 किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरणी सर्वोच्च/मा. उच्च न्यायालयाने सहकारी संस्थेची निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे, अशा सहकारी संस्था तसेच, निवडणूक प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर केवळ संस्थेचे अध्यक्ष /उपाध्यक्ष निवड बाकी आहे अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील अन्य सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगित करून 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.