जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनात समन्वय नसल्यानेच नदीकाठच्या नागरिकांना पुराचा तडाखा 

पुणे : स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागामध्ये  समन्वय नसल्यामुळेच कालच्या पावसात नदीकाठच्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केला असून बाधित कुटूंबियांना सरकारने तातडीने मदत पुरवावी, अशी मागणी केली आहे. (Due to the lack of coordination between the water resources department and the municipal administration, the residents of the river banks are affected by floods)

 

बुधवारी आणि गुरुवारी पुणे आणि आसपासच्या परिसरात तसेच खडसकवासला धरण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पानशेत, वरसगाव, टेमघरसह खासकवासला धरणात पाण्याचा प्रचंड साठा जमा झाला. परिणामी धरणाचे दरवाजे उघडावे लागले आणि नदीतून तब्बल चाळीस हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला. विशेष म्हणजे धरणातून सोडण्यात येणाऱ्या या पाण्याचे प्रमाण, त्याच्या वेळा आणि नदीकाठच्या नागरिकांना सूचित करण्याची खबरदारी यामध्ये जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनाकडून कमालीची हेळसांड केली गेली. परिणामी सिंहगड रस्ता भागातील आनंदनगर परिसरात नदीकाठी असणाऱ्या सोसायट्यांत अचानक पाण्याचे लोटच्या लोट घुसले आणि कित्येक कुटूंबांना त्यामुळे पाण्यात अडकून पडावे लागले.

 

ही बाब लक्षात येताच खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेचे अर्थसंकलपीय अधिवेशन सोडून तातडीने पुण्यात येऊन शुक्रवारी दुपारी या भागातील नागरिकांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत सरकारने या अडचणीच्या काळात कसलेही राजकारण न करता नागरिकांना तातडीची मदत करावी, अशी मागणी केली. सरकारने राजकारण बाजूला ठेऊन या भागासाठी विशेष पॅकेज द्यावे तसेच या प्राधान्याने सफाई काम हाती घ्यावी. पूर स्थिती ओसरल्यानंतर अस्वच्छता वाढून या भागात रोगराई पसरू शकते हे लक्षात घेऊन तात्काळ डास आणि अन्य विषाणू प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पावसाळ्यापूर्वी या भागात नालेसफाई झाली नाही, त्याचाही फटका बसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

 

नदीकाठच्या विठ्ठल नगर, एकता नगरी, राधाकृष्णनगरी परिसर, निंबज नगर, वारजे, शिवणे, उत्तम नगर परिसरात अतिवृष्टी मुळे झालेल्या परिस्थितीची सुळे यांनी यावेळी पाहणी केली. यांपैकी बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. तो तातडीने पूर्ववत करण्याबरोबरच येथील नागरिकांना एक महिन्याचे धान्य, कपडे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली. सर्वसामान्य नागरिकांनीही त्यांनी आवाहन केले असून जास्तीत जास्त नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. प्रशासनानेही नागरिकांना मदतीचे आवाहन करावे, बधित नागरिकांना मदत पुरवली जात आहे का यावर देखरेख ठेवावी इतकेच नाही, तर आगामी काळातही असे संकट आल्यास तात्काळ मदत पुरवता यावी, यासाठी संबंधीत सर्व ठिकाणी कँपची उभारणी करण्याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी यावेळी सुळे यांनी केली.

Local ad 1