पावसाळी वाहिन्या व नालेसफाईची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण होणार
पुणे. पुणे महापालिकेच्या हद्दीसह समाविष्ट गावांमधील पावसाळी वाहिन्या व नालेसफाईची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याबरोबरच पुणे महापालिका (Pune Municipal Corporation), पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) (Pune Metropolitan Development Authority (PMRDA), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचए) (National Highways Authority (NHA) यांच्यासह सर्व सरकारी संस्था पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम संयुक्तपणे करणार आहेत. त्याद्वारे नालेसफाईची कामे प्राधान्याने करण्याबरोबरच नागरिकांना पावसाळ्यामध्ये सतर्क ठेवण्यासाठी एकात्मिक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मंगळवारी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले. (Rainwater channel and drain cleaning work to be completed by June 7)
शहराचा मध्यवर्ती भाग, पेठा, उपनगर व समाविष्ट गावांमध्ये नालेसफाईची कामे व्यवस्थित न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडतो, त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. पहिल्याच पावसाळ्यात रस्त्यांवर, घरांमध्ये पाणी शिरून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. महापालिकेच्या पातळीवर शहरामध्ये नालेसफाईची कामे प्राधान्याने केली जात असली, तरी उपनगरे, समाविष्ट गावांमधील परिस्थिती बिकट असते. या पार्श्वभूमीवर, पावसाळ्याच्या दोन महिने अगोदरच महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्यावतीने त्यावर उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. (Additional Commissioner Prithviraj B.P.) यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक घेण्यात आली. यावेळी मलनिस्सारण विभागाचे उपायुक्त जगदीश खानोरे, अधिक्षक अभियंता दिनकर गोजारे यांच्यासह महापालिका, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, महामेट्रो, हिंजवडी मेट्रो, यासह विविध सरकारी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. संबंधित संस्थांना पावसाळी गटारे व नाल्यांबाबतचा आराखडा तयार करून येत्या आठ दिवसात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे व पीएमआरडीएच्या हद्दीतील ९० किलोमीटरचे नाले व १२५ किलोमीटरच्या पावसाळी वाहिन्यांची सफाई ७ जूनपर्यंत करण्याचे निश्चित करण्यात आले. ही कामे संयुक्त पद्धतीने केली जाणार आहे. ओढ्यांवरील पूल (कल्वर्ट) व पाणी साठण्याची ११६ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणांवर तातडीने सफाई करण्यात येणार आहे. मलनिस्सारण विभागाकडून १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमधील व २३ समाविष्ट गावांमधील नालेसफाईसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
“पावसाळी वाहिन्या व नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. महापालिकेसह पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागांना पहिल्यांदाच एकत्र आणून त्यांच्यात पावसाळ्यासंबंधीची कामे करण्याबाबत समन्वय ठेवला जाणार आहे.’ पृथ्वीराज बी.पी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.