(Dr.Neelam Gorhe) स्वयंसहाय्यता चळवळीतून महिलांच्या आर्थिक उत्थानाला दिशा ः डॉ. नीलम गोर्‍हे

पुणे ः  स्वयंसहाय्यता चळवळीमुळे महिलांना आर्थिक उत्थानाची दिशा मिळाली आहे. या चळवळीबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते. परंतु ही चळवळ  जसजशी वृद्धिंगत होत गेली तस-तसे या चळवळीचे महत्त्व पटत गेले. स्वयंसहाय्यता चळवळीवर संशोधन करून डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी उत्कृष्ट व वास्तव दिशादिग्दर्शन केले आहे. त्यांच्या वस्तुनिष्ठ संशोधनामुळे या चळवळीला अधिक बळकटी मिळू शकेल, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केले. (Dr.Neelam Gorhe)

संविधान फाऊंडेशन आणि स्वयंदीप प्रकाशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंतीच्या औचित्याने आयोजित प्रा.डॉ. महेंद्रकुमार मुरलीधर मेश्राम लिखित ’स्वयंसहाय्यता चळवळीतील महिलांची वाटचाल’ या संशोधन पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख, यशदाचे संशोधन अधिकारी डॉ.बबन जोगंदंड, संविधान फाऊंडेशनच्या रेखाताई खोब्रागडे व छाया मेश्राम यांची उपस्थिती होती.  (Dr.Neelam Gorhe)


प्रारंभी संविधान प्रास्ताविका वाचन करुन निर्जरा मेश्राम यांनी समारंभाची सुरूवात केली. पुढे बोलताना डॉ. गोर्‍हे यांनी स्वयंसहायता चळवळीच्या संदर्भात अनेक दाखले देत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी भरीव कार्य केल्याचे सांगितले. मास्कच्या आतमध्ये सुद्धा स्वतःची जात पाळणारी भारतीय मानसिकता आहे. लोकांच्या मनात परिवर्तन  घडविण्यासाठी समाजातील सर्व घटकांपर्यंत सविधान पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. (Dr.Neelam Gorhe)

 लोकांनी आपल्या आचरणात संविधान आणावे यासाठी प्रयत्न करावे लागतील. कुटुंबामध्ये लोकशाही स्थापन झाली पाहिजे. मुलांशी संवाद झाला पाहिजे. कुटुंबातील लोकशाही हा संविधानाचा पहिला पाया आहे, हे मूल्यभान विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कथेच्या रूपामध्ये छोट्याछोट्या व्हिडिओ क्लिपिंग्स तयार करणे आवश्यक आहे. संविधानाच्या जनजागृतीमध्ये तरुण मुला-मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षित आहे. संविधानाचा खरा अर्थ पोहोचविण्यासाठी संविधानामुळे लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला, हे समजावून सांगावे लागेल. संविधान वाचले तरच समाजातील शोषित-वंचित घटक वाचतील, जात पंचायतीत भरडला गेलेला पीडित समाज वाचेल. संविधानाचे संरक्षण आणि सन्मान करणे आवश्यक आहे. संविधान हा आपला प्राणवायू आहे, असे मार्मिक विचार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले. (Dr.Neelam Gorhe)


     मागच्या काळापासून ते आजच्या काळापर्यंतचा महिला चळवळीचा संपूर्ण पट डॉ.महेंद्रकुमार मेश्राम यांच्या संशोधन पुस्तकाने उलगडला आहे. राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा मानवतेला जे तडे गेले आहेत, त्याचा मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून वास्तव अभ्यास डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी केला आहे. स्वयंसहाय्यता चळवळीबाबत अनेक शंका आणि प्रश्न लोकांच्या मनात होते. बचत गटाच्या चळवळीतून महिला अत्याचाराच्या चळवळीला कलाटणी तर मिळणार नाही ना? महिला अधिकाराच्या चळवळीचे महत्त्व कमी तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न होते. मात्र चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांनी महिलांच्या प्रश्नांचा अजेंडा पुढे कायम ठेवत प्रभावीपणे काम केले. स्वयंसहाय्यता चळवळीच्या संपूर्ण वाटचालीचा डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी तटस्थपणे अभ्यास केला आहे.  कुठल्या मापदंडात कोण पुढारलेले आहेत आणि कोण मागासलेले आहेत यापेक्षा त्यातील अनुभवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम डॉ.महेंद्रकुमार मेश्राम यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे. महिला सक्षमीकरण चळवळीच्या प्रवासाला दृश्यता देण्याचे अत्यंत महत्वपूर्ण कार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी केले असल्याचे निरीक्षण डॉ. नीलम गोर्‍हे यांनी यावेळीआवर्जून नोंदविले.

            यावेळी बोलताना इ. झेड. खोब्रागडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अनुभव सांगत स्वयंसहाय्यता चळवळीतील डॉ.मेश्राम यांचे निष्ठापूर्वक योगदान अधोरेखीत केले. काळजात बाबासाहेब आणि डोक्यात संविधान घेऊन वंचितांना सक्षम करण्याची लढाई प्रा. डॉ. मेश्राम निष्ठापूर्वक लढत आहेत. कवी, कार्यकर्ता, लेखक, प्राध्यापक व संशोधक म्हणून भूमिका पार पाडताना त्यांचा केंद्रबिंदू नेहमीच शोषित, वंचित आणि दुर्लक्षित घटक राहीला आहे. दुर्बलांना सक्षम करण्याच्या त्यांच्या निस्वार्थ व प्रतिबद्ध कार्याच्या मी स्वतः साक्षीदार आहे, असे विचार खोब्रागडे यांनी यावेळी व्यक्त केले.  
      कार्यक्रमाचे संयोजन व आभारप्रदर्शन यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी केले. तर आयकर विभागाच्या उपायुक्त क्रांती खोब्रागडे यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक निरंजन, दिगंबर गोंडाणे, नेहा खोब्रागडे, विजय बैले, शिरीष कांबळे, नमा खोब्रागडे आणि सुमंत जोगदंड यांनी परिश्रम घेतले.

Local ad 1