मुबंई : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सात विकेटनी पराभव करत पहिला महिला आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. (Delhi Capitals lost to Mumbai Indians)
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाने दिल्लीचा पराभव केला. सेविर ब्रंट हिने मोक्याच्या क्षणी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबईने विजेतेपदाला गवसणी घातली. दिल्लीने दिलेले 132 धावांचे आव्हान मुंबईने सात विकेट राखून सहज पार केले.
हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाली मुंबई संघाने विजयी मिळवत इतिहास रचला. या स्पर्धेत मुंबईकडून गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार कामगिरी पाहायला मिळाली. वुमन्स प्रिमीयर लिगमधील आघाडीच्या पाच गोलंदाजात मुंबईच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. तर फलंदाजीत ही मुंबईच्या खेळाडूंचा बोलबला राहिला. केर, ब्रंट आणि मॅथ्यूज यांनी संपूर्ण हंगामात अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले.
दिल्लीने मुंबईला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. पण मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज हेली मॅथ्यूज आणि यात्सिका भाटिया आवघ्या 23 धावांत माघारी परतले. पण त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सेविर ब्रंट यांनी मुंबईचा डाव सावरला. दोघांनी मुंबईला विजयाकडे नेले. पण मोक्याच्या क्षणी हरमनप्रीत धावबाद झाली. मुंबईच्या अडचणी वाढणार असे वाटत असतानाच ब्रंट हिने विस्फटोक फलंदाजी करत मुंबईला विजय मिळवून दिला. ब्रंट हिला अॅमिला केर हिने 14 धावा काढत चांगली साथ दिली. ब्रंट हिने नाबाद 60 धावांची खेळी केली.