...

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आली ‘उपरती’; म्हणे आता आधी रुग्णांवर इमर्जन्सीमध्ये उपचार मग…  

पुणे, गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर प्रसिद्ध अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला एक जीव गेल्यानंतर ‘उपरती’ आली असून, रुग्णालयाने आता इमर्जन्सी मध्ये आलेल्या रुग्णावर आधी उपचार केले जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे. महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर रुग्णालयाची आत्मचिंतन बैठक पार पडली. यावेळी त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक देखील जाहिर केले असून, त्यात वेगवेगळ्या मुद्दे त्यांनी चर्चेत आणले आहेत. गर्भवती तनिषा भिसे (Pregnant Tanisha Bhise) यांना रक्तस्त्राव होत असताना रुग्णालयात आल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमावावा लागला. या घटनेनंतर पुण्यासह राज्यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. राज्य शासनाने याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. (Deenanath Mangeshkar Hospital will first treat patients in emergency)

 

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे पाय खोलात ; महापालिकेने बजावली नोटीस


दरम्यान, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक धनंजय केळकर (Medical Director of the hospital Dhananjay Kelkar) व सदस्यांची आत्मचिंतन बैठक घेतली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांनी या पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंटकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही, आधी उपचार केले जातील असे जाहिर केले आहे. केळकर म्हणाले, २००१ साली दीनानाथ रुग्णालयाची सुरुवात झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रेरणेने व आदर्शवादाच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू झाले. हे रुग्णालय इतरांपेक्षा वेगळे आहे. कारण यात सचोटी, कमिशन प्रॅक्टिसला थारा न देणे, फार्मा इंडस्ट्री कडून कोणतेही पैसे व स्पॉन्सरशिप न घेणे, पेशंट कडून नियंत्रित दरात व शिस्तीत सर्व व्यवहार करणे, जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे, पारदर्शकता व आलेल्या सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्यात आली.
 

दिवसेंदिवस रुग्णालयाची प्रगती वाढत गेली व आजमितिला ८५ हजार आंतररुग्ण दरवर्षी, पाच लाख बाह्य रुग्ण व तीस हजार मोठ्या शस्त्रक्रिया रुग्णालय रुग्णांच्या विश्वासावरच करीत आहे. गरीब रुग्णांना रोज दहा रुपयांमध्ये कुठल्याही विभागाचा केस पेपर, रोज ५० टक्के सवलतीत सर्व तपासण्या व दारिद्य रेषेखालील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याची दर महिन्याला चारिटी कमिशनरला पूर्ण यादी पुरवली जाते. स्वाईन फ्लू कोविड व आताच होऊन गेलेला जीबीएस वा गियाबारी सिंड्रोम या सर्व साथींच्या आजारात रुग्णालयाने अतिशय निस्पृहपणे विलक्षण काम केले. झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईल. परंतु ह्या निमित्ताने असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची सर्व बंधू-भगिनींनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी.

अत्यंत काळा व सुन्न करणारा दिवस…

दीनानाथच्या इतिहासातील शुक्रवारचा दिवस अत्यंत काळा व सुन्न करणारा होता. आजपर्यंतच्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली, महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलची तोडफोड केली. एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले. या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली. लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे. “हेचि काय फळ मम तपाला”, इथपासून ते या समाजात चांगले काम करूच नये अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले मिळू लागले. या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची बैठक झाली. त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली. लोकं कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत किंवा या विषयाला राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन करण्यात आले.

इमर्जन्सीतील रुग्णावर आधी उपचार

महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा बाकी आम्ही सर्व मदत करू असे सांगितलेले असताना कोणालाही न कळवता ते निघून गेले. जेव्हा दीनानाथ सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे. उपचार व शस्त्रक्रिया आणि रुग्णालयाचे नाव वाढत गेल्याने गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले. तसे तसे जास्त महागडी उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास सुरुवात झाली. कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला. यापुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला अथवा लहान मुलांच्या विभागाला आलेला त्यांच्याकडून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम घेणार नाही, असा ठराव केला आहे. शनिवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. 
 
Local ad 1