पॉलिटेक्निक (Polytechnic) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत दहावीच्या निकालापूर्वीच विद्यार्थी होऊ शकतात सहभागी
नांदेड : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष वाया जातो की काय अशी वाटत असतानाच शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी दहावी नंतरच्या पॉलिटेक्निक डिप्लोमा (polytechnic course) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू झाली आहे. या केन्द्रीभूत प्रवेश प्रक्रियेत दहावीच्या निकालापुर्वीच प्रवेश इच्छूक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर 23 जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करुन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल, (Students can participate in the polytechnic course admission process even before the result of class X.) अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी दिली.
पॉलिटेक्निक प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा (सीईटी) नसल्याने विद्यार्थ्यांना केवळ दहावीच्या गुणांनुसार प्रथम वर्षात प्रवेश मिळणार आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेट्रीकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी, प्रॉडक्शन, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स या शाखांचे प्रत्येकी तीन वर्षांचे अभियांत्रिकी (Polytechnic) पदविका अभ्यासक्रम चालवले जातात. रोजगाराभिमुख अभियांत्रिकी शिक्षण ही काळाची गरज असून शालांत परीक्षा निकालापूर्वीच सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ.गोरक्ष गर्जे यांनी केले आहे.
असा करा अर्ज
दहावीच्या निकालापूर्वीच प्रवेश इच्छूक विद्यार्थ्यांना dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर नोंदणी व अर्ज करता येईल. अर्जात विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेचा आसन क्रमांक अचूकपणे टाकायचा आहे. शालांत परीक्षेच्या निकालानंतर माध्यमिक शिक्षण मंडळाकडुन संबंधित विद्यार्थ्यांचे गुण प्राप्त होतील व अर्जदार विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज अपडेट होईल. ऑनलाईन फॉर्म भरताना मुळ कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत. प्रवेश अर्ज भरण्यासाठी ई-स्क्रुटिनी व प्रत्यक्ष स्क्रुटिनी (म्हणजे संस्थेत जाऊन) असे पर्याय उपलब्ध आहेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ई-स्क्रुटिनी या पर्यायाची निवड करता येईल. इ-स्क्रुटिनीमध्ये विद्यार्थी स्वतःच्या संगणकाद्वारे किंवा मोबाईलद्वारे प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर न जाता घरूनच अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात. प्रत्यक्ष स्क्रुटिनीसाठी विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांसह सुविधा केन्द्रावर उपस्थित राहावे लागेल. (Polytechnic)