पुणे : सांगलीतील जत येथे महायुतीच्या प्रचार सभेत भाजप नेते व आमदार सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress Party (Sharad Pawar) President Sharad Pawar) यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार सदाभाऊ खोत यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध केला जात आहे. (BJP leaders should keep their mouths shut, otherwise we will make it difficult to move around: Rohan Suravse Patil of Youth Congress)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खोत यांना खडेबोल सुनावले असून टीका करताना भान ठेवून बोलावे असा इशारा देखील दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून खोत यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला जात आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील म्हणाले, “भाजपच्या नेत्यांनी इतर पक्षातील नेत्यांबाबत बोलताना तोंड सांभाळून आणि भान ठेवून बोललं पाहिजे. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांना सत्तेची मस्ती चढली आहे. सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत पातळी सोडून केलेली टीका महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही. महाराष्ट्राच्या जनतेला खोत यांची भाषा अजिबात आवडलेली नसून विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला याची मोठी किंमत मोजावी लागेल. जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.“
इथून पुढे महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याबाबत जर भाजपचा कोणताही नेता पातळी सोडून, बेतालपणे वक्तव्य करेल तर आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना जश्यास तसे उत्तर देण्यात येईल. वाचाळवीरांना भाजप नेत्यांनी नीट समज द्यावी अन्यथा त्यांचे फिरणे मुश्किल करू, असा इशाराही सुरवसे पाटील यांनी दिला आहे.