भाई केशवराव धोंडगे: एक बुलंद आवाज हरपला !
आज भाई गेल्याची बातमी आली.. धक्का बसला. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर लिहिलेलं टिपण सरकन पुढे आलं. भाई केशवराव धोंडगे ! (Bhai Keshavrao Dhondge) मन्याड (Manyad) खोर्यातला बुलंद आवाज. आखाडीला नाबाद 102 वर्षांचा झाला.’ केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा’ असे शब्द बालपणी भजनकरी आळवायचे. त्यातला केशव कोण आणि माधव कोण हे कळायला खूप वर्ष गेली. पण आम्हाला मात्र केशव हे नाव याच अर्थानं डौलदार वाटायचं. कशालाही, कधीच न कचरणारं मराठी मुलखातलं चांगल्या अर्थानं हे आरकाट नाव. कंधारसारख्या छोट्याशा गावातून आलेला हा मुलखावेगळा माणूस एकदोनदा नाही तब्बल सात वेळा आमदार म्हणून आसनस्थ झाला. हे करतांना आपल्या धारणा धडधाकट ठेवल्या. नसते आमदारकी वैयक्तिक लाभासाठी. ती असते विश्वस्त म्हणून पब्लिकनं हातावर ठेवलेली विश्वासाची पावती. या गोष्टीचं सातत्यशील भान भिजवून ठेवलं. नाहीच होऊ दिला तिकडं किंचितही कानाडोळा. (Bhai Keshavrao Dhondge Loud voice lost !)
भाईंनी शंभरी ओलांडली.परंतु तेज म्हणाल तर तिरंदाजी.तसूभरही टंगळमंगळ न करणारं.खरं तर वयाचा आणि केशवरावांचा अर्थात भाईंचा संबंधच काय? केशवराव हा वय विसरून जगणारा वीर.विशीत असताना जो दणकटपणा होता वागण्या बोलण्यात.तोच आजही आरकाट. पोट आणि ओठ यांची सलगी असते अंगात तोवर लागत नाही बट्टा बहुत केल्या बातांना.असली बहुगुणी मात्रा या माणसाच्या रक्ता मांसात भिनलेली.हा माणूस बोलतो तसा वागतो. आणि जे बोलतो ते कोणाच्याही बापाला न डरता- घाबरता. या माणसाला कंधारच्या टापूत म्हणतात मन्याड खोरी वाघ. आहेच हा गडी वाघासारखा.कधीच कोणाला घाबरला नाही हयातीत. विधानसभेत बोलावं ते केशवरावांनीच.
भल्याभल्यांची उडावी झोप असले वाक्बाण वागवायचा हा वीर आपल्या वाणीत. सत्याची लढाई लढताना पाहायचं नसतं जवळचं दूरचं. अशी दमदार भूमिका कधीच नाही दिली त्यांनी कोलमडू. केशवराव उभे राहिले बोलायला म्हणजे थरकापून जायचं सिंहासन.बसायच्या सावरून सभागृहाच्या सकल भिंती. भरायचं कापरं सत्तेच्या काळजात. असोत यशवंतराव चव्हाण वा वसंतराव नाईक अथवा शरद पवार वा शंकरराव चव्हाण. ही मुलूख मैदानी तोफ कडाडत राहिली शेतकरी-कष्टकर्यांचा कैवार घेऊन. हे मुळात शेतकरी कामगार पक्षाचे प्रखर पाईक. हा पक्ष वाढला पाहिजे हमखास हा निदिध्यास. त्यासाठी परोपरीची आंदोलनं. मोर्चे, उपोषणं. ही आयुधंही अस्सल. कधी बोंबल्या मोर्चा तर कधी लाटणं मोर्चा. कधी ठिय्या तर कधी रिकामी घागर भैय्या किती किती नावांनी रंगायच्या कंधारी भिंती. केशवरावांना तसे भाई म्हणूनच संबोधायचा भोवताल.
शेकापचा हा उत्तुंग प्रतिभा असलेला मोहरा. सतत लेखन वाचनात वावरणारा वज्रदेही विद्वान. अभ्यासाची वैज्ञानिक दृष्टी.सगळे पौराणिक ग्रंथ गाठीशी. त्यातलं भलंबुरं शोधण्याची विवेकशील दृष्टी. ’शंबुकाचा खूनी राम व त्याची वानरसेना’असं लिहिण्यासाठी लागते अभ्यासाची बैठक. ही बैठक भाईंनी केलेली भक्कम. तिनंही भाईंकडेच ठाण मांडलेलं.पलंगावर उशापायथ्याला पुस्तकंच पुस्तकं! शाहू ,फुले, आंबेडकर ही त्यांच्या भूमिकेची भक्कम जागा. याच प्रेरणेतून वाचनाचं अफाट वेड. आमदार-खासदार राहिलेला माणूस पुस्तकांना जीव लावतो हे अपवादभूत चित्र या माणसानं केलं दिमाखदार.
आजघडीला पुस्तकांना जिवापाड जीव लावणारा नेता-पुढारी दिसणारच नाही मराठी मुलखात.कोणालाही हेवा वाटावा असं त्यांचं ग्रंथप्रेम. भाई केवळ ग्रंथवाचनच करतात असं नाही. आज वयाच्या शंभरीच्या टप्प्यावरही दररोज चार सहा पानाचा मजकूर लिहितात म्हणजे लिहितातच! वाचन लेखन हीच त्यांची ऊर्जा. आजवर पन्नासेक ग्रंथ लिहिले भाईंनी. वेळोवेळी भाषणंही दिली भरमसाठ. पण व्यवस्थेला नाही त्याची किंचितही खबर. नाही आली कुठली संस्था ’भाई तुम्ही एवढं लिहिलं. चला हा घ्या आमच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान पदरात. होऊ द्या आम्हाला उतराई.’अशी जीभ उकलत नाहीच आली भाईंसाठी कोणत्याही प्रदेशातून! सुमार माणसं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पालखी वाहाताना दिसावीत आणि भाईंसारखा प्रतिभावंत मात्र दुर्लक्षित रहावा. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती! हे ही खरंच. भाईंसारखी माणसं लिहीत नसतात महाराष्ट्र भूषण मिळावा म्हणून वा पडावी संमेलनाध्यक्षपदाची माळ गळ्यात म्हणून!
भाईंनी केला नाही कसलाच स्वार्थलेपी विचार. ठेवले सदैव लिहिते हात. कष्टकरी, कामगारांच्या बाजुनी. भाई लिहीत राहिले. भक्तांची आंधळी भक्ती वजा करून सांगत राहिले हिताच्या चार गोष्टी. चरित्र राजे संभाजींचं असो वा व्यास, वाल्मिकींचं असो उलगडून सांगावं भाईंनीच! टिळक, आगरकर यांच्या भूमिकांचा भपकारा तपासून पाहावा भाईंनीच ! गाडगे बाबा, फुले, शाहू, आंबेडकर या विचारधारेचं सौष्ठव समजावून द्यावं भाईंनीच ! गांधीजी आणि सावरकर यांच्या वर जोखीमीनं बोलावं त्यांनीच ! आपल्या मायमाउलीचं महत्त्व मखरांकित करावं या मुक्ताईसूतानेच ! (Bhai Keshavrao Dhondge Loud voice lost !)
फडके-खांडेकर या वादाचा पर्दाफाश करावा भाईंनीच.
भाईंची लेखणी जशी जोमदार तशीच वाणीही वजनदार. कधीच नाही पडलं त्यांचं भाषण भेलकांडून. विधानसभा असो वा विजयी सभा असो भाईंच्या भाषणानं दणाणून जायचं सभागृह. आचार्य अत्रे हे महाराष्ट्रातलं भलंथोरलं प्रस्थ. ’मराठा’वृत्तपत्र हातात. त्यामुळे अत्रे म्हटलं की भल्याभल्यांना फुटायचा घाम. अत्र्यांना पुरून उरले केवळ केशवराव. अत्रे त्यांना म्हणायचे ’कंधारचा लांडगा’ आणि केशवराव अत्र्यांना म्हणायचे ’मुंबईची बिल्ली’. केशवरावांनी अत्रे यांना वैचारिक शह दिला. त्यासाठी आपल्या ’जयक्रांती’या साप्ताहिकाची रणभूमी केली. भाईंनी अत्र्यांविषयी भरपूर लिहिलं. छिललंही आडवं उभं. पण अत्रे गेले तेव्हा रडले भाई हमसूहमसून. लिहिला त्यांच्यावर डोळे पाणावून टाकणारा अग्रलेख. यासाठी लागतं विशाल अंत:करणं. ते जरूर जपून ठेवलंय भाईंनी. भाई रमले कष्टकरी माणसांत. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखणारा मेंदू त्यांना बसू देत नव्हता स्वस्थ नि शांत. गावोगावी, वाडी तांड्यावर शिक्षणाची गंगा पोचली पाहिजे हा ध्यास. त्यातून आधी कॉलेजला मान्यता मग स्वत:चं लग्न अशी अफलातून प्रतिज्ञा.
जयक्रांती हा घोष भाईंचाच.’जयक्रांती’ हे साप्ताहिक भाईंनी आपल्या विचार भूमिकेच्या भरणपोषणासाठी वाढवलं. तेच त्यांचं आयुध ठरलं. सडेतोड अग्रलेख उगवले इथंच. जयक्रांती हा शब्द लोकांच्या काळजात क्रांतिमान केला.रामराव, नमस्कारा ऐवजीचा ऐवज केला. जयक्रांती हा शब्द परवलीचा करण्यात मावळ्यांनी ही नाहीच केली कसूर.. आज कंधार परिसरात याची प्रचिती कोणालाही येते जरूर.दोन माणसं भेटली म्हणजे आपसूक ओठातून उलगडत येतो जयक्रांती हा शब्द. गुराखी माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठित केलं भाईंनीच. जागतिक गुराखी साहित्य संमेलनाची अफलातून संकल्पना साकार केली भाईंनी.दरवर्षी गुराखी साहित्य संमेलन घेऊन रचला नवा इतिहास भाईंनी. भाई हे प्रचंड ज्ञानभांडार. पौराणिक, ऐतिहासिक आणि आधुनिक संदर्भ साठवून ठेवलेला हा ठेवा. चाळली जराशी त्यांच्या ग्रंथांची पाने आणि लावली थोडी शिस्तीत तर विस्मयानं हैराण होऊन शकेल इथला वैचारिक मठ!
भाईंनी कंधार परिसरात पसरवलं ज्ञानाचं जाळं. सांगितलं लोकांना ज्ञानीयाच्या डोळ्याचं महत्त्व आणि पटवून दिली महती. कसं काढायचं अन्यायाला मोडून याचाही शिकवला आचपेच. भाईंना कसं असतं भय माहीत नाही. विचारमंचावरून बोलताना वेगळी पोझ नाही.मनात तेच माईकात. वर्ष असेल उलटलं कदाचित. शरद पवारांचा सत्कार नांदेडात. कमलकिशोर कदम यांनी योजिलेला. सभेचे अध्यक्ष भाई केशवराव धोंडगे. विचारमंचावरच शिरस्त्याप्रमाणे मिठी, मुका झाला नि भाई बोलले. मनातलं. मनातून. अर्धा तास हशा आणि टाळ्या असा माहोल.’हा माणूस बारामतीचा बारामत्या. काय बोलेल कसा वागेल. कोणाच्या बापाला कळत नाही. पण माणूस मोठा कर्तबगार. महाराष्टाला लाभलेला हा लाखमोलाचा हिरा’इतकं मोकळं-ढाकळं बोलावं ते भाईंनीच. हा माहोल टिकवण्यासाठी पवार साहेबांनाही ठेवावा लागला मग मार्मिकतेचा पदर हाताशी.
भाईंची भेट नसतेच साधीसुधी.
तीनेक वर्षींपूर्वी कंधारला जाणं घडलं. कंधारला गेल्यावर भाईंची भेट टाळणं शक्य नसतं. भाईंना निरोप गेला. त्यांनी तातडीनं बोलावून घेतलं. आम्हाला पाहिल्या पाहिल्या त्यांनी जवळ बोलावलं. आपल्या शेजारी बसवलं. आधी हाताला अत्तर मग तोंडांत खडीसाखर आणि अखरीला कडाडून मिठी. त्या मिठीला साजेसा माऊलींचा मुका (चुंबन). त्या अर्थानं भाई म्हणजे माऊलीच. असो माणूस छोटा वा मोठा या माउलीचा मुका कधीच नाही चोरणार पान्हा. भाईंनी आमच्या अंगावर शाल घालून तोंडात खडीसाखर कोंबली .आमचं स्वागत तर केलंच परंतु आमच्या गाडीच्या चालकाचं स्वागत करायला ते विसरले नाहीत.गाडी चालकाच्या अंगावर जेव्हा त्यांनी शाल पांघरली तेव्हा चालकाला अक्षरशः रडू फुटलं. कोण कुठला हा गरीब माणूस.पण त्याची दखल घेणारे भाई प्रचलित राजकारणाच्या चौकटीत मावणारे नव्हते.
भाई केशवराव धोंडगे हे राजकारणातलं अव्वल नाव.पण या माणसाला त्याची घमेंड मात्र शून्य. कसलाच गर्व, अहंकार नाही येऊ दिला भाईंनी भजनाला. श्रमिक, कष्टकरी, शेतकरी यांची बाजू लढवत राहिले. शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वाडी तांड्यात शिक्षणाचे लावले रोपटे. त्याचाही झाला आज वटवृक्ष. गुरूनाथ कुरूडे यांच्या सारखे मावळे केले उभे अवतीभवती. त्यांनी दिली भाईंना भरमसाठ साथ.
भाई लढले आयुष्यभर सत्तेच्या विरोधात.विचारत राहिले व्यवस्थेला वाचा बसविणारे जाब. असते भाई सत्तेशी लगट करून तर फिरले असते लाल दिव्याच्या गाडीत दिमाखात. नव्हतं त्यांना काहीच अशक्य. अशक्य होतं ते तत्त्वाशी तडजोड करणं. जे भाईंना कधीच नाही जमलं. म्हणूनच भाई तुमच्या आमच्यासाठी विशेष वंदनीय! भाईंनी शंभरी ओलांडली तरी त्यांचा आवाज बुलंद होता. बोलण्यातली रग कायम होती. आज अचानक भाईंच्या निधनाची बातमी कानावर आली आणि एक बुलंद आवाज हरपल्याची जाणीव तीव्र झाली. भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली!
डॉ.जगदीश कदम,
नांदेड. भ्र.9422871432