Mahatma Jotirao Phule Jan Arogya Yojana । नांदेड जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ किती रुग्णांना मिळाला ? तुम्हांलाही मिळेल का ? लाभ जाणून घ्या..

Mahatma Jotirao Phule Jan Arogya Yojana । गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेला आयुष्यमान-भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा जोतिराव फुले ही योजना राज्यात एकत्रित राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेचा लाभ 36 हजार 328 रुग्णांनी घेतल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. दिपेश कुमार शर्मा यांनी दिली. ही योजना गरीबांसाठी वरदान ठरत आहे. (Benefit of Mahatma Jotirao Phule Jan Arogya Yojana in Nanded district) 

दुर्धर आजारांचा समावेश

1 एप्रिल 2020 पासून महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत अनेक दुर्धर आजारांचा आणि शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे. (Benefit of Mahatma Jotirao Phule Jan Arogya Yojana in Nanded district) 

या योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रूग्णालयातून नि:शुल्क वैद्यकीय सेवा दिली जाते. लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयात संगणीकृत नोंदणी केल्यानंतर उपचार दिला जातो. शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शिधापत्रिका, सात/बारा उतारा आणि फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयातील उपचार निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन तसेच एक वेळेचा परतीचा प्रवास खर्चाचा यात समावेश आहे.

विमा कवच

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिकुटुंब 1 लाख 50 हजारापर्यंत विमा संरक्षण मिळते. मुत्रपिड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा अडीच लाख रूपये आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत प्रतिकुटुंब 5 लाखापर्यंत विमा संरक्षण दिले जाते. (Benefit of Mahatma Jotirao Phule Jan Arogya Yojana in Nanded district) 

 

 

 

कोविड-19 चा समावेश

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत कोविड-19 वरील उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान-भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संलग्नीकरण करून एकत्रित स्वरूपात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने 1 एप्रिल 2020 पासून राज्यात अंमलात आली आहे. कोविड-19 रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक भार पडू नये तसेच कोविड-19 महामारीच्या संकटात नागरिकांना आरोग्य विषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा यासाठी म्युकरमोकोसिस आजारांचा यात समावेश करण्यात आला आहे.

शस्त्रक्रियेचा समावेश

महात्मा जोतिराव फुले या योजनेतंर्गत सर्वसाधारण शस्त्रक्रिया, कान, नाक घसा शस्त्रक्रिया, नेत्ररोग शस्त्रक्रिया, स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र, अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया, पोट व जठर शस्त्रक्रिया, कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जरी, बालरोग शस्त्रक्रिया, प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया, मज्जातंतूविकृती शास्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया, वैद्यकीय कर्करोग उपचार, रेडिओथेरपी कर्करोग, त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया जळीत, पॉलिट्रामा, प्रोस्थेसिस, जोखिमी देखभाल, जनरल मेडिसिन, संसर्गजन्य रोग, बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन, हृदयरोग, नेफ्रोलॉजी, न्युरोलॉजी, पल्मोनोलॉजी, चर्मरोग चिकित्सा, रूमेटोलॉजी, इंडोक्रायनोलॉजी, मेडिकल गैस्ट्रोएंटरोलॉजी, इंटरव्हेन्शनल रेडीओलॉजी या शस्त्रक्रियेचा यात समावेश करण्यात आला आहे.

6 हजार 978 शेतकरी कुटुंबांनी घेतला लाभ

या योजनेचा 6 हजार 978 शेतकरी कुटुंबांनी लाभ घेतला आहे. या योजनेतून 14 हजार 360 विविध शस्त्रक्रिया व उपचार शेतकऱ्यांवर करण्यात आले. (Benefit of Mahatma Jotirao Phule Jan Arogya Yojana in Nanded district) 

16 तालुक्यातील लाभार्थ्यांची संख्या

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांच्या समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यात अर्धापुर 694, भोकर 643, बिलोली 786, देगलूर 828, धर्माबाद 324, हदगाव 1 हजार 517, हिमायतनगर 502, कंधार 1 हजार 212, किनवट 855, लोहा 1 हजार 386, माहुर 518 , मुदखेड 681, मुखेड 1 हजार 169, नायगाव 910, नांदेड 4 हजार 68, उमरी 553 अशा एकुण 16 हजार 646 रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यापैकी 33 हजार 672 शस्त्रक्रिया या योजनेतून करण्यात आल्या आहेत.

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ठरतेय वरदान

कार्डियो थोरेसिक सर्जरी 131, कार्डियोलॉजी 2 हजार 183, अतिदक्षता विभागात 434, कान-नाक-घशावर जटिल शल्यक्रियामध्ये 269, एंडोक्राइनोलॉजी 116,जनरल मेडिसिन 274, गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट 105, जनरल सर्जरी 863, स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतिशास्त्र 328, नेफरोलॉजि 1 हजार 155, बालरोगशास्त्र 439, पल्मोनोलॉजिस्ट 2 हजार 408 असे एकुण 34 हजार 654 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. यापैकी 36 हजार 328 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामुळे ही महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही लाभार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे.

श्वेता पोटुडे-राऊत

माहिती अधिकारी नांदेड.
Local ad 1