...

 बारामतीकरांना अजित पवारांची भावनिक साद, म्हणाले आता मांझ ऐका !

बारामती । लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही साहेबांचा मान राखून सुप्रियाला साथ दिली, आता यावेळी मात्र माझं ऐका, बारामती महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नंबर एकची करून दाखवतो, असे आश्वासन देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली.  लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीतील अनेकांनी मला  भेटून लोकसभेला साहेबांसाठी मतदान केलं, मात्र विधानसभेसाठी आम्ही तुम्हालाच साथ देणार, असा शब्द दिला असल्याचे सांगून लोकसभेवेळी जे बरोबर नव्हते, त्यांचा राग मनात धरू नका असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. (Ajit Pawar’s emotional appeal to the people of Baramati)

 

   उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यानंतर कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यानंतर कसबा येथून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये असंख्य वाहनांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण करून अजित पवार यांच्या या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यानंतर एक वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर कन्हेरी येथील मारुती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी भव्य सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, पार्थ पवार, जय पवार, आ. अमोल मिटकरी, कल्याण आखाडे, किरण गुजर, सुरेश पालवे, केशवराव जगताप, प्रशांत काटे, सुनील पवार, योगेश जगताप, सचिन सातव, संभाजी होळकर, जय पाटील, अविनाश मोटे, पांडुरंग कचरे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  (Ajit Pawar’s emotional appeal to the people of Baramati)
 यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये या पाच वर्षात ९००० कोटीची विकासकामे आपण केली आहेत. आपणास ज्या ज्या वेळी राज्य सरकारमध्ये संधी मिळाली, त्यावेळी जास्तीचे काम आपण करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले. महायुती सोबत गेलो तरी आपली फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आपण सोडली नाही. प्रत्येकाच्या जीवनात विकासाचा नवा प्रकाश मला आणायचा आहे, आज मिळालेला प्रतिसाद पाहता आपण भारावून गेलो आहे, तोच उत्साह बारामतीकरांनी वीस तारखेला दाखवावा. आपण बारामती पुरता विचार न करता राज्याचा विचार करून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या राजकीय प्रवासात महाराष्ट्राला पुढे न्यायचा प्रयत्न मी व माझ्या वडीलधाऱ्यांनी केला आहे.” जे जे नवं, ते बारामतीला हवं!”हे स्वप्न प्रत्यक्षात आपण आणला आहे. एकच ध्यास बारामतीचा विकास, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अठरा पगड जाती  गुण्या गोविंदाने रहावे, ही भूमिका आपली आहे. अल्पसंख्यांक समाजासाठी महायुती सरकारने मौलाना आझाद महामंडळाला तीस कोटी वरून 500 कोटींची हमीची किंमत केली. या समाजातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती मध भरघोस वाढ केली.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून  दोन कोटी चाळीस लाख महिलांना योजनेचा लाभ दिला आहे. महायुती सरकारने विचारपूर्वक या योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांचे विज बिल माफ केले आहे. दुधाला अनुदानाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करण्यात आले आहे, मात्र विरोधक गुजरात मध्ये प्रकल्प जात असल्याची अफवा पसरवून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. चांगली कामे करणाऱ्या ठेकेदारांनाच कामे दिली जातात, मात्र मलिदा गॅंग म्हणून आपल्याच लोकांना बदनाम करू नये, असे आवाहन करून चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. या निवडणुकीमध्ये भावनिक न होता विकासावर बोलावे, कोणावर टीका करू नये, असे आवाहन करुन या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने आपण विजयी करावे, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
बिग बॉस विजेता सुरज चव्हाण याने (Bigg Boss winner Suraj Chavan) उपमुख्यमंत्री अजित दादांना झापुक झुपुक मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन केले. यावेळी वासुदेव काळे, अमोल मिटकरी, राजवर्धन शिंदे यांची ही भाषणे झाली.
Local ad 1