...

मोबाईलने ५१ टक्‍के नागरिकांची झोप उडवली !

  •  ५८ टक्‍के भारतीय झोपतात रात्री ११ नंतर
  • ‘वेकफिट’ संस्‍थेचे निरीक्षण
  •  जाणून घ्या भारतीयांच्‍या झोपेचे ‘स्‍कोअर कार्ड’
  •  ४४ टक्‍के नागरिकांना झोपेतून उठल्‍यावरही वाटत नाही ताजेतवाने

 

पुणे : भारतीयांच्‍या झोपेचा बदलत्‍या सवयींबाबतचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. झोपताना मोाबाईलचा होणारा प्रमाणाबाहेरील अतिवापर, रात्री उशिरापर्यंत समाजमाध्‍यमांवर केले जाणारे स्क्रोलिंग आदी कारणांमुळे ५८ टक्‍के भारतीय रात्री ११ वाजल्यानंतर झोपतात, असे निरीक्षण नोंदवण्‍यात आले आहे. झोपेतून उठल्‍यावर ४४ टक्‍के जण हे अपुऱ्या झोपेमुळे त्‍यांना अस्वस्थता वाटते. त्‍यामुळे त्यांच्या दैनंदिन कामकाज व आरोग्‍यावरही परिणाम होतो. तर ३५ टक्‍के भारतीय हे भविष्याबद्दल काळजी करत असल्‍याने त्‍या संबंधित ताण–तणावामुळे त्‍यांच्‍या झोपेत व्यत्यय येत असल्‍याचा निष्‍कर्ष या अहवालातून समोर आले आहे. (Mobile phones have disrupted sleep for 51 percent of citizens!)

 

झोप हा आपल्‍या दैनंदिन प्रक्रियेतील महत्त्वाची बाब आहे. दरवर्षी १४ मार्च रोजी ‘जागतिक झोप दिवस’ पाळला जातो. त्‍यानिमित्‍त भारतीयांच्या झोपेच्या सवयींबाबत प्रकाश टाकणारा ‘द ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०२५’ हे सर्वेक्षण ‘वेकफिट’ या संस्‍थेने मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२५ च्या दरम्‍यान केले. घरोघरी जाऊन केलेल्‍या या सर्वेक्षणात भारतातील विविध शहरांमधील ४ हजार ५०० हून अधिक पुरुष आणि स्त्रिया यांचा प्रतिसाद नोंदवला. या अहवालात रात्री उशिरा झोपेचे वेळापत्रक, डिजिटल साधनांवरील अवलंबित्व, झोपेची बदलणारी वर्तणूक, सध्‍याचा झोपेबाबतचा कल, दैनंदिन जीवनावर त्यांचे होणारे संभाव्य परिणाम हे परिमाण विचारात घेतले.

 

सर्वेक्षणातील प्रमुख निष्कर्ष

  •  ८४ टक्‍के भारतीय झोपण्यापूर्वी त्यांचे फोन वापरतात. वाढलेले डिजिटल अवलंबित्व झोपेमध्ये व्यत्यय आणत असल्‍याचे दिसून आले.
    झोपण्‍यापूर्वी फोनचा हा वापर २५-३० वयोगटात सर्वाधिक (९० टक्‍के) दिसून आले.
  •  ५८ टक्‍के प्रतिसादकर्त्यांनी रात्री १० वाजताची शिफारस केलेली झोपण्याची वेळ ओलांडत सरासरी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी झोपत असल्‍याचे सांगितले.
  • ४४ टक्‍के सहभागींना झोपेतून उठल्‍यावर ताजेतवाने वाटत नाही.
  • सरासरी १८ प्रतिसादकर्ते सकाळी ९ नंतर झोपेतून उठतात.
  • ३५ टक्‍के नागरिकांना भविष्याची चिंता वाटत असल्‍याने त्‍यांना ताण-संबंधित झोपेत व्यत्यय येतो.
  • पुरुषांच्या तुलनेत १३ टक्‍के स्त्रिया एका रात्रीत तीन किंवा अधिक वेळा जाग्‍या होतात.
  • ५१ टक्‍के लोक रात्री उशिरा स्क्रोलिंग आणि बिन्ज-वॉचिंग करतात
  • ५९ टक्‍के नागरिकांना कामावर असताना तंद्रीचा अनुभव येतो.

    या सर्वेक्षणातून भारतीयांच्या झोपेच्या बदललेल्‍या सवयी आणि त्‍यांना विश्रांती मिळण्यासाठी येणाऱ्या आव्हानांना अधोरेखित करणे हा आहे. आरोग्याचा मूलभूत गरज म्‍हणून झोपेला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. त्‍यासाठी झोपेच्‍या वेळेस डिजिटल अवलंबित्‍व कमी करणे गरजेचे आहे.   –  चैतन्य रामलिंग गौडा, संचालक, वेकफिट

Local ad 1