पुणे, विक्री केलेल्या जमिनीचे पुन्हा बेकायदेशीर कुलमुखत्यारपत्र बनवत दुसर्यांदा विक्री केल्याचा दाम्पत्याचा कारनामा उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित १४ जणांविरूद्ध रांजणगाव एमआयडी पोलीस ठाण्यातंर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संगणमताने बनावट कागदपत्रे बनवून दुसर्याकडून जादा रक्कम घेउन त्यांनी जमिनीची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. तक्रारदाराचे कायदेशीर साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र असतानाही आरोपींनी जमिनीची विक्री केली आहे. (Fraud by making illegal power of attorney and selling land)
भीमराव सारंग रोकडे, सुभाष सारंग रोकडे, सविता वसंत राजगुरू, सुनीता भीमराव रोकडे, सागर भीमराव रोकडे, स्वाती सचिन गायकवाड, नीशा भीमराव रोकडे, मंगल सुभाष रोकडे, स्वप्नील सुभाष रोकडे, प्रशांत सुभाष रोकडे, राकेश सुभाष रोकडे, मयूर वसंत राजगुरू (सर्व रा. मुंबई) रविता दीपक पंचमुख, दीपक राजकुमार पंचमुख (दोघे रा. विमाननगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संदीप तुकाराम कुटे (रा. रांजणगाव, शिरूर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संदीप कुटे हॉटेल व्यावसायिक असून, रांजणगाव गणपती परिसरात जमीन गट क्रमांक १०४० यासाठी दीपक पंचमुख यांच्या मध्यस्थीने व्यवहार केला होता. तसेच यापुर्वी गट क्रं ४२१ मधील भोगवटा वर्ग दोनची इनाम वतन ६ ब ची जमीन दीपकने बांधकाम व्यावसायिक प्रभाकर भोसले यांना विकली होती. त्यानंतर त्याच जमीनीचे त्यांनी पुन्हा बेकायदेशीर कुलमुखत्यारपत्राद्वारे विक्री केली. याप्रकरणी दीपकवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा दिपकची पत्नी रविता पंचमुख हिने रांजणगाव गणपती येथील गट क्रमांक १०४० मधील भोगवटा वर्ग दोनची इनाम वतन ६ ब ची जमीन बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून दुसर्याला विकली आहे. त्यानुसार संदीप कुटे यांनी पंचमुख दाम्पत्यासह १४ जणांविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक चव्हाण तपास करत आहेत.