मुंबई । गाव खेड्यातील प्रवशांची जीवन वाहिनी असलेली एसटीला नोव्हेंबरमध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला (Maharashtra State Road Transport Corporation) मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्रतिदीन प्राप्त केले आहे. (ST records record income of Rs 941 crore in November)
मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी रुपयांनी जास्त आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी दिवाळीच्या काळात १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा ही भाडेवाढ नसतांना देखील वाढलेले विक्रमी उत्पन्न हे एसटीवर सर्वसामान्य प्रवाशांनी दाखवलेले विश्वासाचे द्योतक आहे, असे प्रतिपादच महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर (Vice Chairman and Managing Director of the Corporation Dr. Madhav Kusekar) यांनी केले आहे.
Related Posts
एसटीचे प्रवासी उत्पन्न जरी वाढलेले असले तरी, त्याप्रमाणामध्ये एसटीचा खर्च देखील वाढलेला आहे. इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, टायर व सुट्टया भागांच्या दरामध्ये झालेली वाढ याचा प्रतिकूल परिणाम एसटीचा खर्च वाढीवर झालेला आहे. त्यामुळे संचित तोटा ११ हजार कोटी पर्यंत पोहोचला आहे. तसेच या नोव्हेंबर महिन्यात नियमित खर्चा बरोबरच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्यामुळे सुमारे ५२ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा एसटीच्या तिजोरीवर पडला आहे. याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची हजारो कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. या सर्वांचा विचार करुन नाईलाजास्तव उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ राखण्यासाठी एसटीने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे.