Pune Crime News : मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाऊ नये म्हणून त्याच्या मित्राने नशेतच रुग्णवाहिका चालकाच्या दिशेने बंदुकीतून (Shooting) दोन गोळ्या झाडल्या. याशिवाय रुग्णवाहिकेवर दगडफेक करून काचा फोडल्या आहेत. या प्रकरणी वाघोली पोलिसांत दारु पिणाऱ्या व्यक्तीसह दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल रामदास कोलते (वय 32, रा. बकोरी, ता. हवेली), संदीप कैलास हरगुडे (वय 42) आणि अमोल राजाराम हरगुडे (वय 36, दोघे रा. केसनंद, ता. हवेली) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याबाबत रुग्णवाहिका चालक सुधाकर अरुण कानडे (वय 35, रा. कात्रज ) यांनी फिर्याद दिली आहे. (Firing and vandalism of ambulance for friend in Pune)
आता मराठी बोलणाऱ्यांची जबाबदारी वाढली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संदीप हरगुडे याच्या कुटुंबियाने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाण्यासाठी सांगितले आणि त्यांच्या सांगण्यावरुन पुण्यातील जागृती व्यसनमुक्ती केंद्रातून संदीपला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका आली. त्यावेळी संदीपने आपल्या दोन मित्रांना ‘हे मला घेऊन जात आहेत, यांना सोडू नका’ म्हणत दारुच्या नशेत आरडा ओरड केली. त्यावेळी मित्रांना संदीपला ओढत नेत असल्याचे पाहिले आणि थेट परवाना असलेल्या बंदूकीतून हवेत गोळीबार केला. गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर संदीपचे मित्र विशाल कोलते आणि अमोल हरगुडे यांनी दहशत माजवण्यासाठी थेट रूग्णवाहिका फोडली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि रिवॉल्व्हर जप्त केली आहे.
बकोरी फाट्यावरील एका बारमध्ये गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण दारू पित होते. रुग्णवाहिका चालक सुधाकर संदीपला लोणी काळभोरमधील व्यसनमुक्ती केंद्रात नेण्यासाठी आले. त्यांना विरोध करण्यासाठी संदीपने विशालला चिथावणी दिली. त्यामुळे विशालने रागाच्या भरात परवानाधारक बंदुकीतून त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही. त्यानंतर विशाल आणि अमोल यांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक करून काचा फोडल्या.या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विशाल व अमोल या दोघांना तत्काळ ताब्यात घेतले.
संदीपच्या कुटुंबीयांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले होते, परंतु तो तेथून दोन वेळा निघून आला. तो कुटुंबीयांना त्रास द्यायचा. गुरुवारी त्याच्या कुटुंबीयांनी व्यसनमुक्ती केंद्रात फोन करून त्याला नेण्यासाठी सांगितले. त्यामुळे केंद्रातील कर्मचारी त्याला नेण्यासाठी आले होते. मात्र दारूच्या नशेत तिघांनी मोठा गोंधळ घातला आणि गोळीबाप करत रूग्णवाहीकेची तोडफोड केली.