पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. त्यानुसार 20 नोव्हेंबरला मतदान कर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील तिसऱ्या आघाडीने अर्थात ‘परिवर्तन महाशक्ती’नं आपल्या आठ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर उर्वरित विधानसभा मतदार संघांतील उमेदवारांची नावे टप्प्या-टप्प्याने जाहिर केले जाणार आहेत. (Former MLA Subhash Sabne is candidate from Deglur-Biloli Assembly Constituency)
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांमध्ये राज्यात जोरदार टक्कर होणार आहे. या दोन्ही आघाड्यांमध्ये काही छोटे घटक पक्ष आणि संघटना सहभागी झाल्या आहेत. मात्र, विविध कारणांमुळे वाद झाले आणि हे छोटे पक्ष आणि संघटना या दोन आघाड्यांमधून बाहेर पडले. त्यानंतर या सर्वांनी एकत्र येत ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाची तिसरी आघाडी तयार केली आहे. या आघाडीत बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती या मुख्य नेत्यांचा समावेश आहे.
‘परिवर्तन महाशक्ती’ने आठ उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. त्यात अचलपूर विधानसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, रावेर यावलमधून अनिल छबिलदास चौधरी, चांदवडमधून गणेश रमेश निंबाळकर आणि देगलूर बिलोली मतदार संघातून सुभाष साबणे यांनी उमेदवारी देण्यात आली. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने ऐरोली विधानसभा मतदार संघातून अंकुश सखाराम कदम, हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदार संघातून माधव दादाराव देवसरकर आणि हिंगोलीतून गोविंदराव सयाजीराव भवर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर तिसऱ्या आघाडीतील स्वतंत्र भारत पक्षाचे वानमराव चटप यांना उमेदवारी देण्यात आली.
शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्या आहेत. पण त्यावर कोण उमेदवार असतील हे राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन ठरवली, अशी माहिती ‘परिवर्तन महाशक्ती’ आघाडीकडून देण्यात आली आहे.