पीएमआरडीएचे अधिकारी आणि बिल्डरने संगणमत करुन मला बदनाम करण्याचा कट रचला ः चैतन्य महाराज वाडेकर यांचा गंभीर आरोप
पुणे : आमच्या भांबोली गाव (ता. खेड, जि. पुणे) येथे वडिलोपार्जित जागेतील काही हिस्सा बांधकाम व्यावसायिकाला विकला आहे. परंतु त्याने अनधिकृतपणे जी जागा विकली नाही, त्या जागेत यंत्रणेला हाताशी धरून चुकीच्या मोजणीद्वारे बेकायदेशीरपणे ताबा मरुण बांधकाम केले आहे. ते बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतानाही ते न पाडता उलट आमच्या कुटुंबियांवर बिल्डरने दडपशाही केली आहे. माझा अपंग भाऊ ऍड. अमोल वाडेकर यांना शारीरिक व्यंगावरून अपमानकारक वागणूक दिली आहे. तसेच आमच्या जागेतील त्यांचे अतिक्रमण काढले असताना आमच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. मी प्रसिद्ध कीर्तनकार असल्याने मला बदनाम करण्याचा हा संबंधित बिल्डरने अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मला बदनाम करण्यासाठी कट रचला आहे, असा गंभीर आरोप प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. (Chaitanya Maharaj Wadekar’s serious allegations against PMRDA officers)
तसेच या क्षेत्रावर बिल्डरने विकसन परवानगी मिळवताना करण्यात आलेल्या मोजण्या करताना आम्हाला सहधारक असून देखील कोणत्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी सूचना दिली नाही. संबंधित यंत्रणे कडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून परस्पर चुकीच्या मोजण्या करून आमच्या जागेवर अतिक्रमण केले. परिणामी संबंधित व्यवसायिकांनी माझे मोठे भाऊ अॅड. अमोल वाडेकर हे शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याचा गैरफायदा घेत आमच्या मालकीच्या आणि ताबेवहिवाटीच्या जागेत दांडगाईने अतिक्रमण करत बांधकाम चालू केले असून त्याविषयी आम्ही वेळोवेळी पोलिसांकडे लेखी तक्रारी करून देखील आम्हाला दाद दिली गेली नाही. त्यानंतर आम्ही मा. महानगर आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे (पीएमआरडीए) यांचेकडे सदर बांधकाम चालू झाल्यानंतर त्वरित लेखी तक्रार दाखल केली होती, असे म्हटले आहे.
या तक्रारीवर पीएमआरडीए कडून त्यांनी उपअधीक्षक, भूमी अभिलेख, खेड यांचे कडून करण्यात आलेल्या वेगवेगळ्या मोजण्या आधारे विकास परवानगी दिली असल्याने त्या मोजण्या सक्षम प्राधिकरणाकडून रद्द करून सांगितले होते. त्यानंतर आम्ही पीएमआरडीए कडे आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी संबंधित जमिनी विषयी प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे विकास परवानगी कामी इतर कोणत्याही परवानग्या तसेच भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, यासाठी अर्ज देऊन ठेवला होता. तरी देखील पीएमआरडीएच्या अधिकारी संबंधित व्यवसायिकांना आणि बांधकाम धारकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
ही बांधकाम परवानगी ज्या बेकायदेशीर मोजण्यां आधारे देण्यात आली, त्या सर्व मोजण्या रद्द करण्यासाठी माझे मोठे भाऊ अॅड. अमोल सयाजी वाडेकर यांनी भूमि अभिलेख यांच्याकडे अपील दाखल केले होते. सदर प्रकरणी त्यांचे अपील मान्य होऊन सदर सर्व मोजण्या आणि बिनशेती मोजणी तसेच त्या आधारे तयार करण्यात आलेले. त्या मोजण्या रद्द झाल्याने बिल्डरने घेतलेली विकास परवानगी रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आणि ती विकास परवानगी रद्द करण्यात आली होती. तसेच सदर बेकायदेशीर व अवैध बांधकाम पाडण्याचे देखील आदेश देण्यात आलेले होते. या संपूर्ण प्रक्रियेला आम्हाला तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला आणि सदर बांधकाम परवानगी रद्द झाल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिक पीएमआरडीएला भेट देतात व त्यांच्या केवळ एका साध्या अर्जावरून आम्हाला कोणतीही सूचना व नोटीस न देता फक्त विकास परवानगी रद्द झाल्याचे पत्र रद्द करण्यात आले त्यांनी सांगितले.
भूमि अभिलेख यांनी दिलेल्या मोजण्या रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधात बांधकाम व्यावसायिकांनी उपसंचालकभूमी अभिलेख यांचेकडे अपील दाखल केले होते. त्यांच्या या मागण्या फेटाळल्या. त्यानंतर परत पीएमआरडीए कडे लेखी तक्रार करत संबंधित विकास परवानगी रद्द करण्यासाठी अर्ज केला असताना नेहमीप्रमाणे यावेळी देखील पीएमआरडीए कडून टाळाटाळ केली. यानंतर भूमि अभिलेख विभागाने दिलेल्या निर्णयाने व्यथित होऊन बांधकाम व्यावसायिकांनी मुंबईतील महसूल मंत्रालयात फेरतपासणी अर्ज दाखल केला होता. त्यांनीही फेरतपासणी अर्ज नामंजूर केला. त्यानंतरही पीएमआरडीए कडून दखल घेतली गेली नाही.